नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आझाद हिंद सेनेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात भावूक झाले होते. या प्रकारावरुन आम आदमी पक्षाने त्यांना 'ड्रामेबाज' म्हटलं आहे, तर यशवंत सिन्हांनी मोदींना बिग बी आणि शत्रुघ्न सिन्हांपेक्षा मोठा अभिनेता म्हटलं आहे.

नागपुरात आपचे खासदार संजय सिंग, भाजपला रामराम ठोकलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा, भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा आणि नुकतेच भाजपातून बाहेर पडलेले आशिष देशमुख एकाच मंचावर उपस्थित होते. हे सर्व नेते गेल्या वर्षीप्रमाणेच शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन विदर्भातील अकोल्याला जाऊन मंगळवारी एक शेतकरी परिषदेचे आयोजन करणार आहेत.



महागठबंधन होत आहे, रणनीती ठरत आहे, फक्त ती आताच सांगत नाही, अशी भूमिका यशवंत सिन्हा यांनी घेतली आहे. मोदी हे अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यापेक्षा मोठे अभिनेते आहेत, असं यशवंत सिन्हा म्हणाले.

आझाद हिंद सेनेच्या कार्यक्रमातील अश्रू हे मोदींचं नाटक असल्याचा आरोप संजय सिंग यांनी केलं. या वक्तव्याला शत्रुघ्न सिन्हा यांनी मान डोलावून समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं.

भाजपविरोधात सर्व पक्ष आणि नेत्यांची मोट बांधायला निघालेल्या यशवंत सिन्हा यांना अद्यापही आपल्या मुलाला म्हणजेच केंद्रीय राज्य मंत्री जयंत सिन्हा यांचं मन वळवण्यात यश आलेलं नाही.