सोलापूर : सरकारी शाळेच्या शिक्षकांना ब्लेझर घालण्याची सक्ती सोलापूर जिल्हा परिषदेने केली आहे. 19 नोव्हेंबरपासून ब्लेझर घालून शाळेत येण्याचे आदेश शिक्षकांना देण्यात आले आहेत. यावरुन शिक्षक संघटना आणि जिल्हा परिषद आमनेसामने उभे ठाकले आहेत.
38 अंश सेल्सिअस तापमानात सोलापूर जिल्हा परिषदेचे गुरुजी काळ्या रंगाच्या सुटाबुटात दिसणार आहेत. आता विद्यार्थ्यांप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व गुरुजीही गणवेशात येणार आहेत. अशा निर्णयाचं परिपत्रकच सोलापूर जिल्हा परिषदेनं जारी केलं आहे.
आधीच उकाडा त्यात सुटाबुटात पोरांना शिकवाचं म्हणजे तारेवरची कसरतच. हा निर्णय झाल्यानंतर गुरुजींना मात्र घाम फुटला आहे. 8-9 तास लोडशेडिंग असतं. त्यात ब्लेझर घालून बुजगावण्यासारखे वाटू, असं काही शिक्षक म्हणतात, तर ब्लेझर ऐवजी जॅकेट देण्याचा पर्याय शिक्षक संघटनेच्या अध्यक्षांनी सुचवलं आहे.
गावात जिल्हा परिषदेचे शिक्षक, विद्यार्थी आणि गावकरी यांचं आपुलकीच नातं असतं. सुटाबुटाच्या निर्णयामुळे गावागावात गुरुजींची जणू थट्टाच सुरु झाली आहे. मुलंसुद्धा गुरुजींना साहेब म्हणू लागली आहेत.
जिल्हा परिषदेने घेतलेला निर्णय शाळांच्या विकासासाठी आणि दर्जा सुधारण्यासाठी असावा, पण या निर्णयाची अंमलबजावणी करताना शिक्षकांचं घामटं निघणार, हे नक्की.