Yashomati Thakur Neelam Gorhe Twitter War : महाविकास आघाडीतील नेते (Maha Vikas Aghadi)अनेकदा एकमेकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निशाणा साधत असल्याचं समोर येत असतं. आता अशीच टोलेबाजी शिवसेना (shiv sena) आणि काँग्रेस (Congress) नेत्यांमध्ये सुरु असल्याचं दिसतंय. राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन हा नवा वाद सुरु झालाय. ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर विधानसभेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी टोला लगावला आहे. या वादाची ट्विटरवर चर्चा रंगली आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आहेत महाविकास आघाडीचे जनक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार. त्याचं झालं असं की काल शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 57 वी पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांचं कौतुक करत म्हटलं की, पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही, असं ठाकूर यांनी म्हटलं.






यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर अर्थातच शिवसेनेकडून प्रतिक्रिया येणं अपेक्षितच होतं. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं की, यशोमती ठाकून यांनी अमरावतीत विधान केले आहे की शरद पवार मुख्यमंत्री असते तर वेगळे चित्र दिसले असते. यशोमतीताई, मला तर असे वाटते की पवार साहेबांना UPAचे अध्यक्ष करावे! त्यामुळे तर पूर्ण भारताला ऊपयोग होईल! देता प्रस्ताव? असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या ट्विट्सची चर्चा जोरात आहे. यावर कार्यकर्ते देखील आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.






या कार्यक्रमास श्री शिवाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनिल केदार, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांच्यासह अमरावतीतील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षागृहाचे उद्घाटन तसंच महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आले.