न्यूयॉर्क : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या यशश्री मुंडेंचा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट’ म्हणून गौरव करण्यात आला आहे.


यशश्री यांची कॉर्नेल विद्यापीठात एलएलएम पदवी पूर्ण झाली. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात त्यांचा ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट’ म्हणून गौरव करण्यात आला. कायद्याच्या अभ्यासासाठी कॉर्नेल विद्यापीठ हे जगातील पाच प्रमुख विद्यापीठांपैकी एक आहे.

‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट’ या गौरवासोबत यशश्री यांना 250 अमेरिकन डॉलर्सची रक्कम देण्यात आली. मात्र ती रक्कम यशश्री यांनी तेथील अनाथाश्रमाला दान केली. यशश्री यांच्या मोठ्या बहीण आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे या देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

प्रवेशासाठी अर्ज केलेल्या जगातील केवळ 11 टक्के विद्यार्थ्यांनाच या विद्यापीठात प्रवेश मिळतो. त्यामध्ये यशश्री मुंडे यांचा समावेश होता. शिवाय पदवीदान समारंभामध्येही त्यांचा ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट’ म्हणून गौरव करण्यात आला, ही देशासाठी अभिमानाची बाब मानता येईल.

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर यशश्री राजकारणात येतील का, याबाबतही अनेक तर्क वितर्क लावले जात होते. शिवाय त्यांचं लग्न करण्याचाही अनेकांनी सल्ला दिला होता. मात्र यशश्री यांनी या सर्व गोष्टी दूर ठेवत शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं. पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश मिळवला.

यशश्रीच्या यशाचा अभिमान : पंकजा मुंडे

कॉर्नेल विद्यापीठाच्या सभागृहात जेव्हा ‘यशश्री गोपीनाथ मुंडे’ हे नाव घेतलं तेव्हा गहिवरुन आलं. मुलीने शिकून मोठं व्हावं, हीच मुंडे साहेबांची इच्छा होती. यशश्रीने स्वबळावर या विद्यापीठात प्रवेश मिळवला. तिने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर स्वतःला सिद्ध करुन दाखवलं, याचा अभिमान आहे, असं पंकजा मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.