परळी (बीड) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या परळी बाजार समिती निवडणुकीत धनंजय मुंडेंनी बाजी मारली आहे.
राष्ट्रवादीने 18 पैकी 14 जागा जिंकत भाजपचा दारुण पराभव केला आहे. भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते.
जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आले असतानाही सुरेश धस यांच्या बंडखोरीमुळे सत्ता स्थापन करण्यास राष्ट्रवादीला अडचण निर्माण झाली होती. जिल्हा परिषदेच्या सर्व राजकारणामागे पंकजा मुंडे असल्याचे बोलले जात होते. याच सर्व प्रकाराचा धनंजय मुंडे यांनी परळी बाजार समितीत बदला घेतला आहे.
गेल्या तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायचे. पंडित अण्णांनी बंडखोरी केल्यानंतर या बाजार समितीवर धनंजय मुंडेंनी एक हाती अंमल ठेवला होता. आता तीच परळी बाजार समिती पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या हातात आली आहे.