मुंबई : सांगलीच्या स्मृती मंधानाच्या खणखणीत शतकाच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून धुव्वा उडवला आहे. या विजयाबरोबरच भारतानं विश्वचषकातील सलग दुसरा सामनाही जिंकला आहे.

भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आपल्या प्रभावी क्षेत्ररक्षणाच्या जोरावर वेस्ट इंडिजचा डाव 50 ओव्हरमध्ये आठ विकेट्स घेत 183 वर गुंडाळला. स्मृती मंधानाच्या नाबाद 106 धावा जोरावर भारतानं 183 धावांचं लक्ष्य सहज पार केलं.

वेस्ट इंडिजनं भारतासमोर 183 धावांचं आव्हान दिलं होतं. या  धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली. सुरुवातीलाच भारताला दोन झटके बसल्यानंतर सलामीवीर स्मृती मंधानाने कर्णधार मिताली राजसोबत संयमी खेळ केली. या दोघांच्या जोडीनं भारतीय संघाच्या खेळीला आकार दिला. कर्णधार मितालीनं 88 चेंडूत 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

स्मृती मंधानानं 108 चेंडूत 13 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 106 धावांची खेळी केली. कर्णधार मिताली राजनं 46 धावांची खेळी केली. येत्या 2 जुलैला भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.