पंढरपूर : विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह 10 ते 15 काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विठ्ठल-रखुमाईचं व्हीआयपी दर्शन घेतलं. विशेष म्हणजे 25 जूनपासूनच व्हीआयपी दर्शनास बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही माणिकराव ठाकरेंनी व्हीआयपी दर्शन घेतलं.


विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाच्या रांगेत लाखो भाविक अनेक तासांपासून उभे असतानाही माणिकराव ठाकरेंना व्हीआयपी दर्शनाचा मोह आवरला नाही. त्यात व्हीआयपी दर्शन बंद असतानाही माणिकराव ठाकरेंनी व्हीआयपी दर्शन घेतलं.

विठू माऊलीच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर चालत येणाऱ्या भाविकांना चांगल्या पद्धतीने दर्शन घेता यावं, यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हीआयपी दर्शन बंद !

राज्यभरातील पालख्या पंढरीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. त्यामुळे आषाढीच्या तोंडावर व्हीआयपी दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, यामुळे तथाकथित व्हीआयपी मंडळीचा सामान्य भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. आमदार, खासदार आणि मंत्रालयातून चिठ्ठ्या घेऊन येणारे हे व्हीआयपी झटपट दर्शनासाठी गर्दी करीत असल्याने दर्शन रांगेत भाविकांना तासंतास ताटकळत उभं राहावं लागतं. यामुळेच 25 जूनपासून सर्वच प्रकारच्या व्हीआयपींसाठी असलेलं झटपट दर्शन बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

या शिवाय 25 जूनपासून ऑनलाईन दर्शन व्यवस्था देखील बंद केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.