वर्धा वर्ध्यातील पुलगाव शस्त्रसाठ्यातल्या स्फोटाचं नेमकं कारण अजून कळू शकलेलं नाही. मात्र,  निष्काळीपणामुळे ही आग भडकून स्फोट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

बचावकार्यादरम्यान सुखरुप वाचलेले अग्निशमन दलाचे जवान चंद्रमणी लाडे यांनी हा दावा केला आहे. आग लागल्यानंतर सर्वात पहिले घटनास्थळी पोहचणाऱ्या टीममध्ये चंद्रमणी लाडे होते.

 

लाडेंनी दिलेल्या माहितीनुसार आग लागलेली शेड सोडून त्या शेजारी असलेल्या शेडमध्ये कुलिंग ऑपरेशन करणं गरजेचं होतं. पण त्यावेळी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. ज्या ठिकाणी ही आग लागली होती, ती विझवण्याचे आदेश दिले. पण अधिकाऱ्यांचा हा प्रयत्न असफल ठरला आणि ही आग इतर शेड्समध्ये पसरून स्फोट झाला. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला. या घटनेत मृतांचा आकडा 18 वर पोहचला.

 

चंद्रमणी लाडे यांच्या मते, ज्या शेडला आग लागली ती विझवण्यास सांगून, त्या शेडवरच लक्ष देण्यास सांगण्यात आलं, मात्र त्याचवेळी दुसऱ्या शेड्सचं कुलिंग करून, त्या बाजूला करणं आवश्यक होतं. ते न झाल्यामुळे इतकी मोठी आपत्ती ओढवली.



सर्वात मोठ्या शस्त्र भंडारात अग्नितांडव

 

देशातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र साठा असलेल्या वर्ध्यातील पुलगावमधील दारुगोळा भांडाराला सोमवारी रात्री दीडच्या सुमारास आग लागली. या आगीत ले. कर्नल आर.एस.पवार आणि मेजर मनोज कुमार यांच्यासह 1 लष्कराचा आणि अग्निशमन दलाचे 15 जवान शहीद झाले.


 

संरक्षणमंत्री जवानांच्या भेटीसाठी रुग्णालयात

 

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही या प्रकरणाची तातडीने दखल घेत, पुलगावला धाव घेतली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी जवानांची विचारपूस केली.

 

दोन गावांचं स्थलांतर

 

या स्फोटामुळे दारुभांडार परिसरातील दोन गाव पूर्णपणे स्थलांतर करण्यात आली आहेत. नागझरी आणि आगरगाव अशी या गावांची नावं आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी गंभीर होती की परिसरातील असलेल्या घरांची छतं कोसळली आहेत. अनेकांच्या कानाचे पडदेही फाटले आहेत. काही घरांच्या भिंतीना भेगा पडल्या असून घरांसाठी लावलेले खांब कोसळल्यामुळे अनेकांनी घर सोडलेली आहेत.  या स्फोटानंतर रात्री घटनास्थळी अग्निशमनच्या दोन गाड्या पोहोचल्या होत्या.  मात्र त्या दोन्ही गाड्यांसहित दोन जिप्सी आणि आणखी दोन छोट्या गाड्या स्फोटात खाक झाल्या आहेत.

 

28 किमीमध्ये दारुगोळा भांडार

 

दारुगोळा भांडाराचा हा परिसर तब्बल 28 किमीमध्ये पसरला आहे. या स्फोटामुळे केंद्रीय दारुगोळा भांडाराजवळील दोन गावं नागझरी आणि आगरगाव येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. पुलगाव दारुगोळा केंद्राचा संपूर्ण भाग हा लष्कराच्या अखत्यारित येतो. त्यामुळे येथे स्फोट कशामुळे घडला याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.



रात्री दीडच्या सुमारास स्फोट : खासदार रामदास तडस

 

रात्री दीडच्या सुमारास आवाज आला, गच्चीवरुन पाहिल्यावर आगीच्या ज्वाला दिसत होत्या. त्याचवेळी पुलगाव आग असल्याचं समजलं. आम्ही गाड्या काढून तातडीने त्याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी परिसरातील गावकरी घराबाहेर पडले होते, असं वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितलं.

 

घातपाताची शक्यता नाकारता येत नाही- निवृत्त कर्नल

 

पुलगाव दारुगोळा भांडारात नेमकी आग कशामुळे लागली, याबाबतची माहिती चौकशीनंतर समोर येईल, मात्र पठाणकोटप्रमाणे इथेही घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंका निवृत कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केली.

 

आशियातील दुसऱ्या क्रमाकांचं शस्त्रास्त्र भंडार

 

पुलगाव दारुगोळा भांडार हे भारतीय लष्कराच्या सर्वात मोठ्या दारुगोळा भांडारापैकी एक आहे. तर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं दारुगोळा भंडार आहे.

 

इथे दारुगोळा बनवण्यासोबतच मोठा शस्त्रसाठाही आहे. त्यामुळे हा परिसर संवेदनशील आहे. पुलगाव दारुगोळा भांडाराचा संपूर्ण परिसरत सुमारे 28 किलोमीटरचा आहे. या परिसरात लष्कराच्या जवानांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही.

 

इथे शस्त्रास्त्रांचा साठा असल्यामुळे साहजिकच मोठ्या सुरक्षा व्यवस्थेचं कवच असतं. शस्त्रास्त्रांचे अनेक बंकर बनवलेले असतात. प्रत्येक बंकरमध्ये सुमारे 5 ते 6 हजार किलो शस्त्रास्त्रांचा साठा असतो.

 

मात्र आज जी आग लागली ती नेमकी कोणत्या बंकरला लागली आणि त्या बंकरच्या सुरक्षेसाठी किती जवान होते, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

 

संबंधित बातम्या


पुलगाव स्फोट : 16 जवान शहीद, अनेकांच्या कानाचे पडदे फाटले


लष्कराच्या पुलगाव दारुगोळा भांडारात स्फोटांची मालिका


पुलगाव स्फोट : 1 लेफ्टनंट, 1कर्नल, 14 जवान शहीद