एमएचटी-सीईटीचा विभागवार निकाल जाहीर
एबीपी माझा वेब टीम | 01 Jun 2016 02:57 AM (IST)
मुंबई: मेडिकल आणि इंजिनियरिंगसाठी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचसीईटीचा (MH-CET) निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. पण परीक्षेत कोण टॉपर ठरलं हे मात्र जाहीर करण्यात आलेलं नाही. केवळ विभागनिहाय निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान सविस्तर निकाल आज सकाळी 10 वाजता डीएमईआरच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाविद्यालयांनाही आजच विद्यार्थ्यांच्या गुणांची यादी देण्यात येणार आहे. मेडिकलची मेरिट यादी ही 197 गुणांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. तर इंजिनियरिंगची मेरिट यादी 200 गुणांपासून सुरु होण्याचे संकेत आहेत. या परीक्षेला राज्यभरातले 4 लाख 9 हजार 275 विद्यार्थी बसले होते. कुठे पाहाल निकाल? www.dmer.org, www.mhtcet2016.co.in, www.mahacet.org, www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. ‘नीट‘वरुन संभ्रम मेडिकल प्रवेशासाठी ‘नीट’ ही एकच परीक्षा देशभर घेतली जावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र, या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. राज्यातील सीईटी रद्द करुन नीट परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढावली होती. केंद्र सरकारचा अध्यादेश ‘नीट’प्रश्नी राज्य सरकार फेरविचार याचिका केल्या. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अखेर केंद्र सरकारने अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना दिलासा दिला. या अध्यादेशानुसार राज्यात यंदा एमएचटी-सीईटीप्रमाणेच प्रवेश परीक्षा होईल. यामध्ये सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तर खासगी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ‘नीट’द्वारेच प्रवेश मिळणार आहे. यानुसार राज्यातील 2810 जागा या सीईटी परीक्षेतून भरल्या जातील. संबंधित बातम्या