पंढरपूर : आषाढीच्या पार्श्वभूमीवर विठूरायाच्या दर्शनाची आस ठेवून राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला येतात. या भाविकांना आपल्या लाडक्या विठूमाऊलीचं आता 24 तास दर्शन घेता येणार आहे.
महानैवेद्यानंतर देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला. आषाढी यात्रेचा सोहळा संपेपर्यंत म्हणजे 13 जुलैपर्यंत विठूमाऊली चोवीस तास भाविकांच्या दर्शनासाठी उभी राहणार आहे.
थकवा जाणवू नये, यासाठी विठूरायाच्या पाठीला कापसाचा लोड बसविण्यात आला असून रुक्मिणी मातेच्या मागे कापसाचा तक्क्या लावण्यात आला आहे.
विठूरायाच्या काकड्यापासून शेजारती पर्यंतचे सर्व राजोपचार बंद होणार असून सकाळी नैवेद्य, सायंकाळी लिंबूपाणी आणि सकाळी नित्यपूजा एवढेच उपचार देवाला केले जाणार आहेत.
व्हीआयपी दर्शन बंद!
विठू माऊलीच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर चालत येणाऱ्या भाविकांना चांगल्या पद्धतीने दर्शन घेता यावं, यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यभरातील पालख्या पंढरीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. त्यामुळे आषाढीच्या तोंडावर व्हीआयपी दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र यामुळे तथाकथित व्हीआयपी मंडळीचा सामान्य भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. आमदार, खासदार आणि मंत्रालयातून चिठ्ठ्या घेऊन येणारे हे व्हीआयपी झटपट दर्शनासाठी गर्दी करीत असल्याने दर्शन रांगेत भाविकांना तासंतास ताटकळत उभं राहावं लागतं. यामुळेच 25 जूनपासून सर्वच प्रकारच्या व्हीआयपींसाठी असलेलं झटपट दर्शन बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
या शिवाय 25 जूनपासून ऑनलाईन दर्शन व्यवस्था देखील बंद केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.