पंढरपूर : चंद्रभागेच्या पात्रातील जीवघेणे खड्डे एबीपी माझाने दाखवल्यानंतर प्रशासन खडाडून जागं झालं आहे. जप्त वाळूने खड्डे बुजवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
चंद्रभागेच्या वाळवंट आणि पात्रातील जीवघेणे खड्डे भाविकांसाठी सापळा बनू लागल्याचे वास्तव एबीपी माझाने दाखवल्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तातडीने हे सर्व खड्डे वाळूने भरण्याचे आदेश दिले. चंद्रभागेच्या पात्रातील खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने काही दिवसापूर्वी चार लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.
आता आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूरकडे येत असताना चंद्रभागेच्या अत्यंत दुरावस्था झाल्याचे वास्तव एबीपी माझाने समोर आणले होते. त्यानंतर महसूल प्रशासनाने वाळूमाफियांकडून जप्त केलेली वाळू या चंद्रभागेच्या वाळवंट आणि नदी पात्रात टाकून खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत.
नगरपालिका प्रशासनाने काल रात्रीपासून वाळवंटात वाळू आणून टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, आज सकाळी या आणून टाकलेल्या वाळूच्या चोरीस सुरुवात झाल्याने हे वाळू चोर आता थेट प्रशासनाला आव्हान देऊ लागले आहेत.
ज्या वाळूमुळे चंद्रभागेत स्नानासाठी येणाऱ्या भाविकांचा जीव वाचणार, तीच वाळू आता या चोरांनी पळवण्यास सुरुवात केली आहे. याच वाळवंटात उभ्या केलेल्या टॉवरवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, प्रशासन सीसीटीव्हीने शूट केलेलं फूटेजही पाहत नसल्याने वाळूचोरी राजरोसपणे सुरु आहे.
भाविकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या माफियांवर आता तरी प्रशासन कारवाई करुन भाविकांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवणार का, हाच प्रश्न भाविकांना पडला आहे.