World Sparrow Day 2021 :

  अकोला : आज 20 मार्च... 'जागतिक चिमणी दिवस'... जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा दिवस. कधीकाळी आपल्या चिवचिवाटानं माणसाचं भावविश्व समृद्ध करणारी चिऊताई आज कुठे जास्त दिसत नाहीये... त्यामुळे गेल्या दशकभरात चिमणी संवर्धनासाठी जगभरात जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. अलिकडे या प्रयत्नांच्या यशातून परत चिऊताईंचा किलबिलाट शहरांतून ऐकायला येऊ लागला आहे. 


कधीकाळी पक्षांच्या चिवचिवाटाणे उगवलेली प्रसन्न सकाळ तुम्हाला आठवत असेल. तो पाखरांचा किलबिलाट आणि पक्षांचा चिवचिवाट मनाला एक नवी शक्ती आणि प्रेरणा देणारा. पण काळ बदलला तसा सकाळचा किलबिलाट आणि चिवचिवाट बऱ्याच अंशी कमी झालाय. कवितेतील, बालगीतातील लहान मुलांची चिऊताई आपल्या घराच्या अंगणातून कधी हद्दपार झालीय. नामशेष व्हायला लागलीय, याचा आपल्याला थांगपत्ताही लागला नाहीय. काळ बदलला, तशी तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने क्रांती होत गेली आणि हीच प्रगती चिऊताईच्या जीवावर  उठलीय. मात्र, नैसर्गिक अधिवासातालं चिमणीचं महत्व अतिशय मोठं आहे. 
 
सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील अनेक जाती तर इतिहासजमा झाल्या आहेत. 'पासर डोमेस्टीकस' (Passer Domesticus) अर्थातच 'हाऊस स्पॅरो' (House Sparrow) ही चिमण्यांची जात सर्व जगभरात आहे. जगभरात 26 जातीच्या चिमण्याची नोंद आहे. मात्र या 26 पैकी फक्त 23 चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत. चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक धोके उभे राहिले आहेत. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरातील तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव झालीय. अन् यातूनच 2010 पासून 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातोय. अकोल्यातील 'निसर्ग कट्टा' या निसर्गसंवर्धनासाठी कार्यरत संस्थेनं चिमणी वाचविण्यासाठी गेल्या दशकभरात भगीरथ प्रयत्न चालविले आहेत. 


अकोल्यात 'निसर्ग कट्टा' संस्थेनं चिमणी संवर्धनासाठी शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये गेल्या दशकभरात सातत्याने जनजागृती केलीय. चिमणी संवर्धनासाठी शहरांतील विद्यार्थ्यांना लाकूड, वाया गेलेले पुठ्ठे आणि मातीपासून बनविलेली कृत्रिम घरटी दिलीत. अनेक विद्यार्थ्यांना ते बनविण्याचे प्रशिक्षण दिलेय. सोबतच या कृत्रिम घरट्यासाठी चिमण्यांना आवश्यक असलेलं गवत, काड्या, तागाच्या दोऱ्या, कापूस या घरट्यांच्या आसपास ठेवलं गेलंय.  


 मागच्या वर्षी भारतात प्रथमच 'सिटीझन सायन्स' संकल्पनेचा वापर करून पक्ष्यांचा 'भारतीय पक्षी सद्यस्थिती अहवाल 2020 तयार केला गेलाय. यात देशातील दोन सरकारी आणि आठ स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या. अहवाल देशभरातील 15 हजार 500 पक्षी निरीक्षकांच्या जवळपास 1 कोटी नोंदींवरून बनविण्यात आलाय. या अहवालात देशभरात गेल्या काही दशकांत चिमणी आणि मोरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं निरिक्षण समोर आलं होतंय. हेच अकोल्यातील प्रयत्नांनी दाखवून दिलंय.


अकोल्यातील अनेक घर, अंगण, फ्लॅटमध्ये चिमण्यांसाठी खाद्य, पाण्याची उपलब्धता केली गेलीय. यातूनच अकोल्यातील अनेक सिमेंटच्या घरांतूनही आता चिमण्यांची चिवचिवाट गुंजतांना दिसतोय. अनेक जागरूक नागरिकांच्या चिमणी संवर्धनासाठीचा पुढाकार या अहवालाला बळ देणारा आहे. 


चिमणी नामशेष होण्याची कारणे :


१) वाढते औद्योगीकरण अन त्यामुळे वातावरणात झालेला अमुलाग्र बदल आणि वाढलेले प्रदूषण.
२) शहरीकरण आणि  त्यातून उदयाला आलेली 'फ्लॅट संस्कृती', आधीच्या काळात कौलारू घरं, त्यासमोर असणारी विहीर यामुळे चिमण्यांना आपले घर बनविणे अतिशय सोपे होतेय. बांधकामाची पद्धतीमूळे चिमण्यांच्या निवासावर  संक्रांत.
३) शहरीकरणामुळे कमी झालेले जंगल. मोबाईल टॉवर्सची वाढलेली संख्या. 
४) शेतीत वाढलेल्या रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या वारेमाप वापराने चिमण्यांचे प्रमाण कमी झाले. कारण शेतातील धन्य खालल्याने चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे वाढलेले प्रमाण.
५) विणीच्या हंगामात चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास. वाहनं आणि गर्दीचा गोंगाट.


चिमण्यांना वाचविण्यासाठी हे करूयात :
१) उन्हाचा दाह वाढल्याने या पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी एखादे मातीचे भांडे पक्ष्यांना पाणी पिणे पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ठेवावे.
२) या पक्षांसाठी कमीत कमी दहा फुट उंचीवर लाकडाचे किंवा कपट्याचे कृत्रिम घरटे तयार करावे.
३) पक्षांना लागणारे धान्य दररोज त्यांना उपलब्ध होईल  अशा पद्धतीने टाकणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे.


पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. आपल्या किलबिलाटानं आयुष्याचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व अन् वैभव जपणं म्हणूनच गरजेचं आहे. नाही तर उद्याच्या पिढीला पुस्तकातून 'एक होती चिऊताई' असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये इतकंच...