सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना स्थानिकांनी चागंला धडा शिकवला आहे. विद्यार्थिनींनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं छेड काढणाऱ्यांना चांगलाच चोप दिला.


सिंधुदुर्गात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या कामासाठी मध्यप्रदेशमधून कामगार आले आहेत. या कामगारांमधील काहीजण या मार्गावरुन जाणाऱ्या शालेय विद्यार्थिनींना त्रास देत होते, त्यांची छेड काढत होते.


रोड रोमिओंच्या रोजच्या त्रासाला वैतागलेल्या संतप्त विद्यार्थिनींनी आणि पालकांनी अखेर त्यांना चोप दिला आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ पिंगुळी हायवेवर हा सगळा प्रकार घडला. संतप्त मुलींनी चप्पल आणि काठीने या कामगारांना चांगलच बदडून काढलं.


मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ठेका 'दिलीप बिल्डकॉन' या कंपनीकडे आहे. मध्यप्रदेशातील कंपनीचे हे कामगार आहेत. घडलेल्या प्रकाराची माहिती स्थानिकांनी कुडाळ पोलिसांना दिली होती. मात्र माहिती देऊनही पोलीस वेळेवर घटनास्थळी न पोहोचल्याने जमलेल्या संतप्त जमावाने काही काळ मुंबई-गोवा हायवेवरची वाहतूक रोखून धरली होती. पोलिसांनी कामगारांना ताब्यात घेतलं आहे.