नांदेड : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एमआयएम नको असेल, तर वंचित बहुजन विकास आघाडीतून एमआयएम बाहेर पडायला तयार असल्याचं वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीनं ओवेसी यांनी केलं आहे. नांदेडमध्ये बहुजन वंचित विकास आघाडीच्या सभेत ओवेसी बोलत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत येण्याचं आवाहन करत आहेत. मात्र एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध आहे. याविषयी बोलताना ओवेसी म्हणाले की, एमआयएम नको असेल तर मी आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे.


"तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोला, त्यांना हव्या तितक्या जागा द्या. मी एकही जागा लढवणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावरही येणार नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या अटी मान्य करा आणि आघाडी करा. प्रकाश आंबेडकर यांच्या अटी मान्य केल्यास मी स्वतंत्र सभा घेऊन आघाडीचं स्वागत करेन", असं खुलं आव्हान असदुद्दीन ओवेसी यांनी दिलं.


ओवेसी यांच्या भूमिकेचं प्रकाश आंबेडकर यांनीही स्वागत केलं. तसेच वंचितांच्या सत्तेसाठी ओवेसी यांनी ही भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.


काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका


तेलंगणा विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी हैदराबादला जाऊन एमआयएमला आव्हान दिलं होतं. त्यावर बोलताना, आता मी थेट अमेठीला जाऊन भडकावू भाषण देणार असा इशारा असदुद्दीन ओवेसी यांनी दिला.


राहुल गांधींनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही ओवेसी यांनी निशाणा साधला. भ्रष्टाचार फक्त छगन भुजबळ यांनीच केला होता का? साहेबांच्या पुतण्याने काहीच खाल्लं नाही का? असं बोलत ओवेसी यांनी अजित पवारांसर शरद पवारांवर निशाणा साधला. छगन भुजबळांना दोन वर्ष तुरुंगात ठेवणं हा अन्याय आहे. आपल्यासोबत काय घडलं? हे आता त्यांनाही समजलं असेल, असं ओवेसी म्हणाले.


डोबिंवली शस्त्रसाठा कारवाईबाबत पोलिसांचं अभिनंदन


डोंबिवलीत भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णीच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईबाबत बोलताना ओवेसी म्हणाले, "डोबिंवलीत आरएसएसच्या घरात धाडी मारण्याचे धैर्य पोलिसांनी दाखवलं. या कारवाईबाबत पोलिसांचं अभिनंदन करायला पाहिजे."


तर नागपूरमधील रेशीमबागेत धाड मारा, तिथे एके 47 सापडलीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.