पुणे : सनातन संस्थेचे काम आयसिस आणि तालिबानसारखे आहे, असा आरोप इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे. यावेळी श्रीमंत कोकाटेंनी सनातनवर बंदी घालण्याची मागणीही केली.
श्रीमंत कोकाटे नेमकं काय म्हणाले?
“सनातन देशद्रोहाचं काम करत असून, त्यांचा लोकशाहीला धोका आहे. धर्माच्या नावाखाली सनातन आयसिस आणि तालिबानसारखं काम करत आहे. लोकशाहीला धोका असून, देशाची अवस्था सीरिया-अफगाणिस्तानसारखी होईल.”, असे श्रीमंत कोकाटे म्हणाले.
दाभोलकर हत्या किंवा स्फोटक प्रकरणात ज्यांना तपासयंत्रणांनी ताब्यात घेतले आहे, मात्र त्यांच्या पाठीमागे कोण आहे ते शोधले पाहिजे, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.
“सनातन नियतकालिकात मला मारण्याचा लिखाण केले, त्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. मला धोका असल्याचं माध्यमातून समजले आहे. मला तीन वर्षांपासून सुरक्षा दिली आहे. आता देशभर, राज्यभर मला सुरक्षा मिळावी.” अशी मागणी कोकाटे यांनी केली.
सनातनचे जयंत आठवले, संभाजी भिडे आणि श्रीराम सेनेचे प्रविण मुतालिक यांची दहशतवादी संघटना असून सर्वजण एकच आहेत, असा गंभीर आरोप कोकाटेंनी केला.
“विचारवंतांच्या हत्येतील मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. मात्र त्यांच्या सूत्रधाराला अटक करावी. आठवले, भिडे, मुतालिक यांना अटक करावी. त्यांना कायदा सुव्यवस्था मान्य नाही. शस्त्र चालवून प्रशिक्षण दिलं जातंय. देशाविरुद्ध युद्ध पुकारत आहेत. सनातन यापूर्वीच बंदी घालायला हवी होती. यापूर्वीच सनातनवर बंदी घातली असती, तर चार विचारवंताचे प्राण वाचले असते. तत्काल बंदी घातली पाहिजे, सरकारने बंदीवर गांभिर्याने निर्णय घेतला पाहिजे.”, असे श्रीमंत कोकटे म्हणाले.