श्रावणी एकादशीमुळे पंढरपुरात ईदची कुर्बानी नाही!
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2018 01:10 PM (IST)
श्रावण शुद्ध एकादशीसाठी जवळपास साडेतीन लाख भाविक आज विठुरायाच्या दर्शनासाठी शहरात आले आहेत.
पंढरपूर : देशभरात आज बकरी ईद उत्साहात साजरी होत असताना, पंढरपूरमधील मुस्लीम बांधवानी श्रावणी एकादशीनिमित्त फक्त नमाज पढून बकरी ईदचा उत्सव साजरा केला. श्रावणी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने, ईदची कुर्बानी रद्द करण्याचा निर्णय घेत मुस्लीम समाजाने एकात्मतेचे अनोखं दर्शन घडवलं. श्रावण शुद्ध एकादशीसाठी जवळपास साडेतीन लाख भाविक आज विठुरायाच्या दर्शनासाठी शहरात आले आहेत. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग चंद्रभागा वाळवंट या सर्वच परिसरात हजारो भाविकांची गर्दी झाली आहे. त्यातच आज मुस्लिमांचा बकरी ईद हा महत्त्वाचा सणही आहे. विठ्ठल भाविकांना बकरी ईदच्या कुर्बानीचा त्रास जाणवू नये, यासाठी मक्का मशिदीचे इमामसाब हाफिज शेख, अध्यक्ष निसरभाई शेख आणि इतर समाजातील मान्यवरांनी एकत्र येत आजची कुर्बानी रद्द करण्याचा निर्णय घेतला. पंढरपूरमध्ये अनेक वर्षांपासून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे वातावरण आहे. याआधीही एकादशी आणि बकरी ईद जेव्हा एकत्रित आली होती, तेव्हा मुस्लीम समाजाने कधीही कुर्बानी दिली नव्हती, असं मक्का मशिदीचे अध्यक्ष निसरभाई शेख यांनी सांगितलं. त्यामुळे आजची कुर्बानी उद्या दिली जाणार आहे. तसंच केरळमध्ये महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मुस्लीम समाजाने भरघोस आर्थिक मदत गोळा करण्याचं आवाहनही इमामसाब हाफिज शेख यांनी केलं आहे.