कोल्हापूर : जयसिंगपूर येथील प्रयोगशील उद्योजक सुनिल महामुनी यांनी विकसित केलेल्या नारळ काढणी शिडीस केंद्र शासनाचे पेटंट मंजूर झाले आहे. ही शिडी नारळ तसेच सुपारीच्या बागेमध्ये वापरली जाते.

महामुनी गेली 15 वर्षे या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी विकसित केलेली नारळ काढणीची शिडी आज शेकडो शेतकरी, शेतमजूर वापरतात. या शिडीला सेफ्टी बेल्टची योजना केल्याने नारळाच्या झाडावर चढल्यानंतर सुरक्षितपणे नारळ काढणी, फवारणी व स्वच्छता करता येते.

महामुनी यांनी अतिशय कल्पकतेने ही नारळ काढणी शिडी विकसित केली आहे. आजवर कसबी मजूर झाडावर चढून नारळ काढीत असे. मात्र, ते धोकादायक असे. यावर उपाय म्हणून महामुनी यांनी पॅडलच्या सहाय्याने झाडावर सहजपणे चढ-उतार करता येईल, अशी योजना या शिडीमध्ये केली आहे. यामध्ये पॅडल सिस्टिम्स, रबरी हॅण्डल ग्रीप, वायररोप आणि सेफ्टी बेल्टची सोय केली आहे. यामुळे आज शेतकरी, शेतमजूर, महिला आणि मुले-मुली सुद्धा सहजपणे नारळीच्या झाडावर चढतात.

आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील हजारो शेतकरी ही शिडी वापरून नारळ, सुपारीची काढणी करतात. तसेच या शिडीच्या माध्यमातून पुर्णवेळ नारळ, सुपारी काढणीचे काम करणारे मजूर स्वयंरोजगारी झालेले आहेत.

केरळ विद्यापीठाने केलेल्या पारंपारिक सीडीपेक्षा ही शिडी नाविण्यपूर्ण आणि सुरक्षित आहे. केंद्र शासनाच्या पेटेंट विभागाने या शिडीला पेटेंट मंजूर केले असून त्याचा मंजुरी क्रमांक 299829 असा आहे

“आम्ही विकसित केलेली नारळ काढणीची शिडी ही नाविण्यपूर्ण आणि नारळ काढणीतील जोखमीचा विचार करून सुरक्षित आणि दणकट बनविलेली आहे. यामुळे वाकड्या-तिकड्या नारळाच्या झाडावर, पावसाळ्यातसुद्धा सहजपणे आणि बिनधोक चढता येते. गेली काही वर्षे आम्ही यासाठी प्रयत्नशील होतो. केंद्र शासनाच्या विविध चाचण्यातून आम्हाला आता पेटंट मिळालेले आहे. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आमच्या या उत्पादनाला आता युनिक स्वरूप आलेले आहे.”, असे महामुनी यांनी सांगितले. तसेच,  नजीकच्या काळात आम्ही गुजरात, आरिसा, केरळ, त्रिपुरा या राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही शिडी उपलब्ध करणार आहोत, असेही ते म्हणाले.