नाशिक: पत्नी कौमार्य परीक्षेत नापास ठरल्यानं लग्नानंतरच्या अवघ्या ४८ तासात पतीनं तिच्याशी वैवाहिक संबंध तोडल्याची संतापजनक घटना नाशिकमध्ये घडली. या धक्कादायक प्रकाराची दखल महिला आयोगाने घेतली आहे.


 

महिला आयोगाकडून दखल

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

 

पोलिसांच्या अहवालानंतर गरज पडल्यास महिला आयोग पीडित महिलेच्या बाजूने तक्रार दाखल करणार आहे.

 

काय आहे प्रकरण?

लग्नानंतर पत्नीची कौमार्य चाचणी घेण्यात आली. मात्र पत्नी त्यामध्ये नापास झाल्याचा आरोप करत, नवऱ्याने अवघ्या 48 तासात तिच्याशी काडीमोड घेतला. २२ मे ला हा विवाह झाला होता.

 

जातपंचाच्या आदेशानं लग्नानंतरच्या पहिल्या रात्री नववधूची कौमार्य परीक्षा घेतली गेली. पतीकडे जातपंचानी एक पांढऱ्या रंगाची बेडशीट सोपवली. दोघांच्या शारिरिक संबंधांनंतरही बेडशीटला रक्ताचा डाग लागला नाही. म्हणून पत्नी कौमार्य परीक्षेत नापास असल्याचा फतवा सुनावून जातपंच मोकळे झाले.

 

पुढे बहिष्काराच्या भीतीनं मुलीच्या पालकांनी घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, अॅड. रंजना गवांदे यांनी हा प्रकार उजेडात आणला.

 

चांदगुडे यांच्या माहितीनुसार पीडित तरुणीचे पोलीस भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न सुरु होते. त्यामुळे धावणं, सायकल चालवणं, लांब उड्या अशा प्रकाराचा सराव ती नित्यनेमानं करत होती..मात्र शास्त्रीय कारण न तपासता अघोरी मार्गानं कौमार्याचा निर्वाळा लावणाऱ्या जातपंचाना गृहखातं बेड्या कधी ठोकतं..हे पाहणं महत्वाचं आहे.

संबंधित बातम्या


नववधू कौमार्य परीक्षेत नापास, जातपंचांच्या आदेशाने पतीनं लग्न मोडलं