चंद्रपूर : असंवेदनशील वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आमदार विजय वड़ेट्टीवारांना महिला आयोगाने नोटीस पाठवलीय. त्याचसोबत सुभाष धोटे, आमदार सुरेश धानोरकर यांनाही महिला आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राजुऱ्यात आदिवासी वसतिगृहातील लैंगिक शोषण घटनेप्रकरणावरुन पॉक्सोबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन ही नोटीस पाठवण्यात आली आहे.


'पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर सरकार कडून पैसे मिळतात आणि त्यामुळे आदिवासी मुली अत्याचार झाल्याची तक्रार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत' असं अत्यंत संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केलं होतं. या संतापजनक वक्तव्याचा आदिवासी समाजातर्फे तीव्र निषेध करण्यात आला.

VIDEO | तीन-पाच लाखांच्या मदतीसाठी बलात्काराच्या तक्रारीत वाढ, काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्याने संताप | चंद्रपूर | एबीपी माझा



हा आदिवासी समाजाचा अपमान असल्याची भावना संतप्त प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी व्यक्त केली होती. या वेळी संतप्त महिलांनी या काँग्रेस नेत्यांविरोधात नारेबाजी करत त्यांच्या फोटोला चपला मारून आणि थुंकून आपला राग व्यक्त केला. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी काँग्रेस नेत्यांचे हे वक्तव्य म्हणजे बलात्कार पीडित मुलींमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

भाजपने या काँग्रेस नेत्यांवर एट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणानंतर लोकांमध्ये पसरलेला रोष पाहता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सुभाष धोटे यांनी आदिवासी समाजाची माफी मागितली आहे. चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांची पदावरून हकालपट्टी होणार हे आता निश्चित झाले आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी याबाबत संकेत दिले आहेत. काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून सुभाष धोटे यांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांना विनंती करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. या बाबत पक्षश्रेष्ठींना देखील बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

VIDEO | सात विद्यार्थिनींवर अत्याचार, वैद्यकीय तपास अहवालात पुष्टी | चंद्रपूर | एबीपी माझा