परभणी : निवडणुकीत मतदारांच्या बोटाला शाई लावणं एका कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. दिवसभर मतदान केंद्रात शाई लावल्यानंतर रात्री या कर्मचाऱ्याच्या तीन बोटांची आग होऊ लागली. नंतर ते तात्काळ दवाखान्यात गेले, मात्र काहीच फरक न पडल्याने त्यांना परभणीत तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचार सुरु करावा लागला. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी शाई लावताना काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.


परभणी लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान झाले. 6 विधानसभा क्षेत्रातील 2174 मतदान केंद्रावर मतदान पार पडले. यावेळी जिंतूर तालुक्यातील बलसा मतदार केंद्र सहाय्यक केंद्र प्रमुख म्हणून दत्तराव राऊत यांची नियुक्ती करण्यात आली होती. मतदान करण्यापूर्वी प्रत्येकाच्या बोटाला शाई लावण्याचे काम त्यांच्याकडे होतं. त्यानुसार सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी हे काम प्रामाणिकपणे पार पाडले.

मात्र हे काम करत असताना बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईचे ओघळ त्यांच्या बोटांवर येत होते. त्यामुळे उजव्या हाताची तिन्ही बोटं त्या शाईने रंगून गेली होती. काम करत असताना त्यांना लक्षात आले नाही, परंतु रात्री घरी गेल्यावर त्यांचे बोटं दुखू लागली. जिंतूरच्या स्थानिक डॉक्टरांना हा प्रकार दाखवला, त्यांनी तात्पुरते औषधे दिली परंतु त्रास काही कमी झाला नाही. त्यामुळे त्यांनी परभणीतील त्वचारोग तज्ञ डॉ. जोगड यांना हा प्रकार दाखवला. जोगड यांनी शाईमधील केमिकलमुळे हा प्रकार घडला असून, थोड्या दिवसात त्रास कमी होईल, असं सांगितल्यानंतरच दत्तराव राऊत यांचं समाधान झालं.

मागच्या पाच दिवसांपासून शाईच्या प्रादुर्भावामुळे हैराण झालेल्या राऊत यांना सध्या तरी बरं वाटत आहे. मात्र मतदान केंद्रांमध्ये मतदारांना शाई लावणाऱ्या इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी, या प्रकारानंतर काळजी घेणं गरजेचं बनलं आहे.