लठ्ठपणामुळे सासरच्यांनी माहेरी सोडल्याने पिंपरीतील विवाहितेची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 28 May 2019 10:56 AM (IST)
लठ्ठ असल्याने वारंवार टोमणे मारल्याने तसंच माहेरी आणून सोडल्याने प्रियांकाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या भावाने नोंदवली आहे.
पिंपरी चिंचवड : लठ्ठ असल्याने सासरच्या मंडळीने माहेरी आणून सोडल्याने, एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. प्रियांका पेठकर असं विवाहितेचं नाव असून तिने भोसरीमधील राहत्या घरी आयुष्य संपवलं. प्रियांकाचा तीन वर्षांपूर्वी फलटणमधील तरुणाशी विवाह झाला होता. पण लठ्ठ असल्याचं कारण पुढे करत एक वर्षांपूर्वी सासरच्या मंडळीने तिला भोसरी इथल्या माहेरी आणून सोडलं. तेव्हापासून प्रियांका तणावात होती. याच तणावातून तिने शनिवारी (25 मे) गळफास घेऊन आत्महत्या केली. लठ्ठ असल्याने वारंवार टोमणे मारल्याने तसंच माहेरी आणून सोडल्याने प्रियांकाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या भावाने नोंदवली आहे. यासंदर्भात भोसरी पोलिसांनी पती आणि त्याच्या आई-वडिलांसह आणखी एकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.