नांदेड : घरात चोर शिरले, तर भल्या-भल्यांची बोलती बंद होते. मात्र नांदेडमधील सिद्धिविनायक नगर भागात राहणाऱ्या दोन महिलांनी तीन ते चार चोरट्यांना चांगलंच पिटाळलं. महिलांचा रौद्रावतार पाहून चोरांनीही धूम ठोकली.


सिद्धिविनायक नगर भागत राहणार्‍या मीना शर्मा यांच्या घरात रात्री 2 वाजण्याच्या सुमारास कसलासा आवाज येऊ लागला. हा आवाज ऐकून कृष्णा शर्मा यांना जाग आली. त्यांनी घरच्या वरील बाजूला जाऊन आवाज कशाचा येतोय, हे शोधण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच 3-4 चोरटे त्यांच्या घरचा दरवाजा तोडून आत शिरले. त्यांनी कृष्णा शर्मा यांना जोरदार ठोसा मारुन जखमी केले. यात कृष्णा शर्मा बेशुद्ध झाले.

कृष्णा शर्मा यांची पत्नी मीना शर्मा यांनी हे दृश्य बघितले. त्यांनी बाजूला पडलेली गजाळी उचलली. या गजाळीने जीव घेण्याची चोरांना धमकी दिली. त्यांचा रौद्रावतार पाहून चोरट्यांनी तेथून धूम ठोकली.

मीना शर्मा यांच्या घरी अपयश आल्यावर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा बाजूच्या नगरात वळवला. पहिला मजल्यावर राहणार्‍या अनिता कंधारे यांचे घर चोरट्यांनी गाठले. त्यांच्या घरचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अनिता यांना जाग आली. अनिता यांचे पती बाहेरगावी होते. त्यांच्यासोबत त्यांची 2 लहान मुले होती. अनिता यांना चोरट्यांची चाहूल लागली. चोरट्यांनाही अनिता जागी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी अनिता यांना गुमान दरवाजा उघडण्याची धमकी दिली. अनिता यांनीही होकार दिला. पण त्यांनी मिरचीची पूड हातात घेऊन खिडकीतून चोरट्यांच्या डोळ्यात फेकली. मग काय चोरट्यांनी तिथूनही पोबारा करावा लागला.

नांदेड जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी हैदोस घातला आहे. जिल्ह्याच्या विविध भागत एकाच रात्री रांगेने 4-5 ठिकाणी चोरी होत आहे. हा प्रकार मागील 15 दिवसांपासून सुरू आहे. पण नांदेड पोलिस मात्र रात्रीला बहुदा झोपेत आहेत. त्यामुळेच चोरट्यांनी रात्रीच्या चोरीचा सपाटा लावला आहे.