नागपूर : अतिमद्यपानामुळे शुद्ध हरपलेल्या अवस्थेत तिघांनी जीव गमावल्याची घटना नागपुरात घडली आहे. शहरातील तीन वेगवेगळ्या भागात दोघांनी गळफास घेतला तर एकाचा चुकून रॉकेल पिऊन मृत्यू झाला.


मद्य विक्रीतून मोठा महसूल मिळत असल्यामुळे सरकारही दारुबंदीसाठी फारसं आग्रही नसतं. मात्र, दारु सेवनाचे किती वाईट परिणाम होतात याचा प्रत्यय नागपुरात आला.

पहिली घटना नागपूरच्या गणेशपेठ पोलिस स्टेशन अंतर्गत आदर्शनगरमध्ये घडली. 28 वर्षांच्या पंकज महतो या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अतिमद्यपान केल्यामुळे पंकजचे पत्नीसोबत भांडण झाले. रागाने पत्नी घराबाहेर निघून गेली आणि दारुच्या नशेत शुद्ध हरपलेल्या पंकजने गळफास लावून स्वतःचा जीव घेतला.

दुसरी घटना मानकापूर भागात घडली. निलेश बोबडे या 32 वर्षीय तरुणाने दारुच्या नशेत स्वतःचा जीव घेतला. दारुच्या व्यसनामुळे नैराश्याने ग्रासलेल्या निलेशने राहत्या घरी गळफास घेतला.

तिसरी घटना जयताळा परिसरात घडली. 65 वर्षांच्या कैलाश चुटे नशेत असताना चुकून रॉकेल प्यायले. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडून त्यांचा मृत्यू झाला.

तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे.