औरंगाबाद : औरंगाबादमध्ये 8 बोगस महिला डॉक्टरांना महापालिकेच्या आरोग्य विभागानं ताब्यात घेतलं आहे. शहरातल्या नारेगाव परिसरात या महिला नागरिकांवर औषधोपचार करत होत्या.
विशेष म्हणजे महापालिकेच्या वतीनं आपण आल्याचं सांगत त्यांनी नागरिकांची दिशाभूल केली आहे. मात्र महापालिकेनं असा कुठलाही कॅम्प लावला नसल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नगरसेवक राजू शिंदे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली.
आरोग्य विभागाने छापा मारला त्यावेळी आठ महिला डॉक्टरांच्या वेशात आढळून आल्या. आरोग्य विभागानं त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात बोगस महिला डॉक्टरांनी कॅम्प लावल्याची माहिती आहे.
धक्कादायक म्हणजे, या महिलांकडे 'दीपकभाऊ सदाशिव निकाळजे फ्रीडम फायटर चॅरिटेबल ट्रस्ट, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने' असं लिहिलेल्या काही पावत्या मिळाल्या आहेत. तपासणी फी वीस रुपये आणि औषध 30 रुपये अशाप्रकारे त्या पैसे उकळत होत्या.
काही महिला गावात फिरुन आरोग्य तपासणी सुरु असल्याचा प्रचार करुन महिलांना तपासणी करण्याचं आवाहन करत होत्या. मात्र छापा पडल्याचं लक्षात येताच अवाहन करणाऱ्या महिलांनी पळ काढला.
कुठल्याही रोगासाठी या महिला एकच औषध देत होत्या. या आठही महिला एम. सिडको पोलिसांच्या ताब्यात आहेत. महापालिकेनं या बोगस महिला डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.