सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले गावात 19 वर्षीय तरुणीच्या गूढ मृत्यून खळबळ उडाली आहे. अंकिता पवार असं तरुणीचं नाव आहे. गावातील वडाचीवाडी येथील फुटका देवीचा कडा येथील जंगलमय भागात अंकिताचा मृतदेह आढळला आहे.


अंकिताच्या मानेचा अक्षरश: लचका तोडण्यात आला. मृतदेहासभोवती रक्ताचा सडा पडला होता, तर आजूबाजूच्या झाडावरही रक्त उडालेले होते. अंकिता गुरुवारी संध्याकाळी जंगल परिसरात लाकडे गोळा करण्यासाठी गेली होती.


एखाद्या हिंस्त्र प्राण्याने अंकितावर हल्ला केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर हिंस्त्र प्राण्याने हा हल्ला केल्याचं वाटत नसल्याचा दावा वनविभाग केला आहे. या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे अंकिताच्या मृत्यूचे गूढ वाढलं आहे. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर मृत्यूचे निश्चित कारण समजू शकणार आहे.


सिंधुदुर्ग येथे जिल्हा रुग्णालयात अंकिताच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. सध्या अंकिताच्या मृत्यूबाबत विजयदुर्ग पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.