सांगली : केवळ ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ न शकल्याने एका वृद्ध कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. सुमारे 8 तास आपल्या आज्जीला ऑक्सिजन बेड मिळावा म्हणून नातवाने जंगजंग पछाडल. मात्र, शेटवपर्यंत बेड उपलब्ध होऊ न शकल्याने महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणावर नातवाने व्हिडीओ बनवत सोशल मीडियावर पोस्ट करत प्रशासनाच्या अनास्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.


सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडून पडली आहे. अनेक कोरोना रुग्ण उपचाराविना तडफडून मरत आहेत. बेड आणि ऑक्सिजन वेळेत मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र, दुसर्‍या बाजूला प्रशासनाकडून बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे दावे वारंवार करण्यात येत आहेत. पण मोठ्या प्रमाणात रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांचा जीव जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातला मृत्यूचा दर महाराष्ट्रात आणि देशात जास्त असल्याचं समोर आलेलं आहे.


तब्बल 8 तास शहर फिरूनही ऑक्सिजन बेड मिळाला नाही


बुधवारी अशीच एक धक्कादायक आणि हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मिरज तालुक्यातल्या बेडग या ठिकाणी असणाऱ्या चंद्रभागा महादेव कोरे (वय वर्षे 80) या वृद्ध महिलेला तब्बल 8 तास शहर फिरूनही उपचार मिळू न शकल्याने मिरजेत रस्त्यातच मृत्यू झाला आहे. वृद्ध महिलेला त्रास होऊ लागल्याने त्यांचा नातू असणाऱ्या शैलेश कोरे हा आपल्या आजीला बुधवारी रात्री 9 वाजता गाडीतुन घेऊन उपचारासाठी सांगलीला पोहोचला होता. त्यांनतर सांगली महापालिकेच्या कोल्हापूर रोड वरील असणाऱ्या आचार्य आदिसागर कोरोना सेंटर मध्ये कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.


Coronavirus | वैद्यकीय उपचारांवरील निश्चित दराला विरोध; राज्यातील सगळे डॉक्टर क्वॉरंटाईन करून घेणार?


अन् आजीने चालत्या गाडीतच आपले प्राण सोडले


त्यानंतर शैलेशच्या आजीची ऑक्सिजन लेवल हळूहळू कमी होऊ लागली होती. त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी तातडीने बेड ऑक्सिजन असणाऱ्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला आणि तेथून शैलेश आपल्या आजीला घेऊन सांगली आणि मिरज शहरातल्या कोरोना हॉस्पिटल शिवाय इतर हॉस्पिटलची दारे ठोठावली. सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या दारातही आपल्या आजीला घेऊन पोहोचत अॅडमिट करून घेण्याची याचना केली. मात्र, त्या ठिकाणी ही ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही, अशीच उत्तरे मिळाली. प्रशासनाच्या बेड कॉल सेंटर मधूनही त्याने बेड उपलब्ध असल्याची वारंवार चौकशी केली. मात्र, त्या ठिकाणीही त्याला बेड नसल्याचे उत्तर मिळाले आणि रात्रभर आपल्या आजीला गाडीतून घेऊन फिरणाऱ्या शैलेशवर अखेर काळाचा घाला झाला आणि पहाटे पाचच्या सुमारास तिच्या आजीने चालत्या गाडीतच आपले प्राण सोडले. प्रशासनाच्या आरोग्य व्यवस्थेविरोधात उद्विग्न होऊन शैलेशने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. सध्या सांगलीत अनेक कोरोना रुग्णांना आणि नॉन कोविड रुग्णावर उपचार होत नसल्याने त्याचा मृत्यू होत आहे.


Sangli Corona | कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना सांगलीत लॉकडाऊनचं राजकारण