सोलापूर : सोलापूरमध्ये परीक्षा केंद्रावर महिलेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला संतप्त जमावाने मारहाण केली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी पर्यवेक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सोलापूरच्या राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळेत मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. भाग दोनची परीक्षा सुरु होती. परीक्षाकेंद्रात पर्यवेक्षक अकबर नदाफ ड्युटीवर होता. या परीक्षा केंद्रात परीक्षा देणाऱ्या विवाहित विद्यार्थिनीसोबत पर्यवेक्षकाने उत्तरपत्रिकेवर सही करण्यावेळी लगट केली. पहिल्यांदा विद्यार्थिनीने त्यांना विनंती करुन तेथून जाण्यास सांगितले. मात्र जाणूनबुजून पर्यवेक्षकाने असभ्य वर्तन करायला सुरुवात केली. या महिलेने परीक्षेनंतर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला.
संतप्त नातेवाईकांनी पर्यवेक्षक अकबर नदाफ याला परीक्षाकेंद्रावर येऊन चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावर तातडीने कारवाई करत पोलिसांनी अकबर नदाफ नावाच्या या पर्यवेक्षकाला अटक केली आहे.
दरम्यान महिलेचा विनयभंग झाल्याचं कळताच संतप्त नातेवाईकांनी शिक्षकाला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला असून आरोपी शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे.