मुंबई : राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर सलग तिसऱ्या दिवशीही संपावर आहेत. बुधवारपासून इंटर्न डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. स्टायपेंड अर्थातच विद्यावेतनामध्ये वाढ करावी अशी प्रशिक्षणार्थींची प्रमुख मागणी आहे.

राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसला आहे. सगळीकडे रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. पण प्रशासनाला संपावर तोडगा काढण्यास अद्याप यश आलेलं नाही. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात खूप कमी विद्यावेतन दिलं जातं. सर्वच राज्यांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 15 ते 30 हजारांपर्यंत स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन दिलं जातं. मात्र महाराष्ट्रात सर्वात कमी 6 हजार रुपयेच प्रशिक्षणार्थींना दिले जातात.

मंगळवारी अस्मी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेची राज्य सरकारसोबत बैठक झाली, मात्र लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे बुधवारपासून त्यांनी संप पुकारला आहे. या संपात बीएमसी हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरही सहभागी असतील.

मुंबईत इंटर्न डॉक्टरांनी आपल्या मागण्यासाठी सायन रुग्णालयात काल गुरुवारी 6.30 वाजता कॅन्डल मार्च काढला.

संपाचा पुण्यात काय परिणाम?

पुण्यासह राज्यभरातील इंटर्न डॉक्टर बुधवारपासून संपावर आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयातील बी जे मेडिकलचे 180 डॉक्टर संपावर गेले आहेत. तसंच राज्यातील 2100 इंटर्न डॉक्टर संपावर गेले आहेत.

प्रत्येक वेळी फक्त आश्वासन देण्यात आली, मात्र ती पूर्ण झाली नाहीत. जो पर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा संप असाच चालू राहील, अशी भूमिका या इंटर्न डॉक्टरांनी घेतलेली आहे. मात्र ससूनमधील वैद्यकीय सेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.

बी जे मेडिकलमध्ये संपाला पाठिंबा म्हणून गुरुवारी रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराला इंटर्न डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, अशी माहिती बी जे मेडिकलचे  डॉ केतन देशमुख यांनी दिली.

काय आहेत संपकऱ्यांची मागणी?

विद्यावेतन हे सध्याच्या 6000/- पासून वाढवून 15000/- इतके करावेत

वाढीव विद्यावेतन फेब्रुवारी 2018 पासून लागू करण्यात यावे.

विद्यावेतनात वेळोवेळी संशोधन करुन ते वाढवण्यात यावे.

इतर राज्यात किती स्टायपेंड?

उत्तर प्रदेश- 17,900/-

कर्नाटक-  19,975/-

पश्चिम बंगाल- 21,000/-

केरळ- 20,000/-

आसाम- 20,000/-

छत्तीसगड- 20,000/-

ओदिशा- 20,000/-

बिहार- 15,000/-

आंध्रप्रदेश- 13,000/-

तेलंगणा- 13,000/-

हरियाणा- 11,800/-

पंजाब- 9,000/-

गुजरात- 10,700/-

संबंधित बातम्या :

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस, रुग्णसेवेला फटका

राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आजपासून संपावर