अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शेतामध्ये शेळी गेल्याच्या किरकोळ कारणावरुन दोन गटातील वादानंतर एका महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र आरोपी अद्यापही मोकाटच आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव गावात 12 सप्टेंबरला हा प्रकार घडला होता. गावातील रहिवाशी वाघस्कर कुटुंबीय आणि गावातील दुसऱ्या एका कुटुंबामध्ये शेतात शेळी गेल्याच्या कारणावरुन वादावादी झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झालं. या भांडणात पडलेल्या महिलेला वाघस्कर कुटुंबीयांनी विवस्त्र करुन मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाल्याची माहिती अहमदनगर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. महिलेला विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या जयसिंग वाघस्कर, संतोष वाघस्कर, मनोहर वाघस्कर आणि कुटे या चौघांविरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाण झालेल्या कुटुंबियांवरही मारहाण आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबाने केला आहे. घटनेनंतर तीन दिवसांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला.
विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर आरोपींना न्यायालयाने 28 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजुर केला आहे. त्यामुळे आरोपींना अटक न केल्यास 1 ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा इशारा पीडित महिलेच्या कुटुंबियांनी दिला आहे.
मात्र आरोपींविरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगचा गुन्हा दाखल असताना पोलिसांनी आरोपींना अटक का केली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.