नंदूरबार : जादूटोणा करुन पैशांचा पाऊस आणि चांगल्या बायकोसाठी अघोरी पुजेचा प्रकार नंदूरबार शहरात उघड झाला आहे. शहराच्या मुख्य मध्यवस्तीत असणाऱ्या सोनार गल्ली, जळका बाजार परिसरात हा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेप्रकरणी नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपी आणि मुख्य पुजाऱ्याला ढेकवद गावातून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपींचा गेल्या तीन-चार दिवसांपासून एका घरात जादूटोणाचा प्रकार सुरु होता. आरोपींनी परिसरातील काही तरुणांना या पुजेसाठी बोलावलं होतं. घरात येऊन चहापान केल्यानंतर या तरुणांनाही आपल्यासोबत काय केलं जात होतं, हे कळत नव्हतं. यातील एका पीडिताने आपल्याला विवस्त्र करुन पूजा केल्याचे घरच्यांना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. महत्त्वाचं म्हणजे, गरज पडल्यास तुझा नरबळी द्यावा लागेल, असं आरोपींनी म्हटल्याचं तक्रारदाराने पोलिसांना सांगितलं.
या प्रकरणी रात्री उशिरा नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील एकाला रात्री तर पुजाऱ्याला सकाळी अटक करण्यात आली. पुजारी हा ढेकवद गावाचा रहिवासी असून दुसरा आरोपी तरुणांना फूस लावून पुजेसाठी आणत असल्याचं समोर आलं आहे. शहर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.