मुंबई : कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी (Covid Center Scam) आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केल्यानं तुमच्या याचिकेत तथ्य राहत नाही, त्यामुळे ती मागे घ्या, अशी सूचना मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं गुरूवारी सोमय्या ( Kirit Somaiya) यांना केली. तसेच या प्रकरणी बाहेर बोलताना आधी आपली माहिती कागदोपत्री योग्य आहे की नाही, याची चाचपणी करावी असे खडे बोलही सुनावले. मात्र सोमय्या यांनी ही याचिका मागे घेण्यास नकार दिला व वकिलाऐवजी किरीट समोय्याच कोर्टसमोर बोलू लागल्यानं संतप्त झालेल्या न्यायाधीश हेमंत जोशी यांनी याचिका मागे घ्या, नाहीतर तुमच्या विरोधात अवमान याचिकाच दाखल करू असा दम सोमय्यांना भरला. त्यानंतर सोमय्या शांत झाले आणि न्यायालयानं या प्रकरणावरील सुनावणी 30 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.


लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटनं कोट्यवधी रुपयांचा कथित घोटाळा केल्याची तक्रार देऊनही पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा आरोप करत भाजपच्या किरीट सोमय्या यांना महानगर दंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र याप्रकरणी पोलिसांनी आता एफआयआर दाखल केली असून आता याचिका मागे घ्या असे न्यायाधीशांनी सोमय्या यांच्या वकिलांना सांगितले पण वकिलांऐवजी सोमय्या यांनी ही याचिका मागे घेणार नसल्याचं दंडाधिकाऱ्यांना सांगितलं. 


शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी जवळीक असल्यानेच सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांनी लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचं कंत्राट मिळवलं. तसेच यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे. सोमय्या यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी हे प्रकरण आता आर्थिक गुन्हे अन्वेषण (Crime Branch, Mumbai Police) विभागाकडे सोपवावे अशी मागणी केली. मात्र याप्रकरणी मुंबई पोलिसांनी स्वतः सुमोटो तक्रार दाखल केली असून आझाद मैदाऩ पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे तुमची मागणी मान्य झाली असून आता ही याचिका मागे घेण योग्य राहील, असा सल्ला वकिलांना दिला. परंतु सोमय्या यांनी पुढे येत याचिका मागे घेणार नसल्याचं न्यायाधीशांना सांगत कोर्टाने याचिका मागे घेण्याबाबत स्वतः आदेश द्यावेत अशी मागणीही केली. 


संबंधित बातम्या :



तुरुंगातही संजय राऊतांची लेखणी सुरूच; स्वतःवरील आपबीती पुस्तक रुपात मांडणार, कुणाचा भांडाफोड होणार?