Maharashtra News : शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेनंतर आता त्यांचे बिझनेस पार्टनर सुजीत पाटकर यांच्याविरोधात मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुजीत पाटकर (Sujit Patkar) आणि अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीनं बोगस कागदपत्रं दाखवून खोट्या पद्धतीनं कोविड सेंटरचं कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. पुरेशी क्षमता नसल्यानं अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. 


किरीट सोमय्यांचा आरोप काय? 


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठा गौप्यस्फोट करत कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. शिवसेना खासदार संजय राऊत हे भागिदार असलेली लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनी अस्तित्वातच नाही. तरीही कोविड सेंटरचं कंत्राट या कंपनीला देऊन तब्बल शंभर कोटींचा जम्बो कोविड घेटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट करत काही गोष्टी मांडल्या होत्या. 


किरीट सोमय्या ट्वीटमध्ये म्हणाले होते की, "शिवसेना खासदार संजय राऊत यांची भागिदारी असलेली सुजीत पाटकर यांची बनावट कंपनी आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनीच अस्तित्वातच नाही. परंतु, या कंपनीला दहिसर, वरळी NSCI, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. या कोविड सेंटरमध्ये अनेक कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून या कंपनीने शंभर कोटी रूपयांचा जम्बो कोविड घोटाळा केला आहे.", असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच, त्यांनी या घोटाळ्याची चौकशी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ऑथरिटीनं  (NDMA) करावी, अशी मागणी केली होती. 


पाहा व्हिडीओ : Sanjay Raut यांचे व्यावसायिक भागीदार Sujit Patkar यांच्याविरोधात गुन्हा दाखल 



सुजीत पाटकर ईडीच्याही रडारवर 


पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांची काही दिवसांपूर्वी ईडीनं चौकशी केली आहे. स्वप्ना पाटकर या सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. त्यांनी घटस्फोट घेतला आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रांसह चौकशीसाठी हजेरी लावली होती.