Winter Assembly Session : उद्यापासून (9 डिसेंबर) नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Nagpur Winter Assembly Session) सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाची पूर्ण तयारी झाली आहे. विविध मुद्यांवरुन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच या अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आमने-सामने येण्याची शक्यता आहे. नागपुरात (Nagpur) पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


उद्या उद्धव ठाकरे नागपूरला जाणार


राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. उद्यापासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे सुरुवातीचे दोन दिवस (सोमवार आणि मंगळवार) सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे हे उद्या नागपुरात दाखल होणार आहेत.


सत्तांतर झाल्यानंतर नागपूरमध्ये प्रथमच अधिवेशन


महाविकास आघाडी सरकारच्या काळात डिसेंबर 2019 मध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडलं होतं. त्यानंतर कोरोना प्रादुर्भावामुळं नागपूरऐवजी मुंबईतच अधिवेशन पार पडले होते. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नागपूरमध्ये पहिलंच हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. सत्तांतरांनंतर ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजापासून उद्धव ठाकरे दूर राहिले होते.


अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षांची बैठक


विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. त्यानंतर दोन वाजता विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होईल. दुसरीकडे संध्याकाळी साडेपाच वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, सायंकाळी पाच वाजता चहापानाचा कार्यक्रम होणार आहे.


दुपारी 12.15 वाजता मुख्यमंत्र्यांचे नागपुरात आगमन होणार


या अधिवेशनासाठी मु्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजच नागपूरला रवाना होणार आहेत. दुपारी 12.15 वाजता त्यांचे नागपूरमध्ये आगमन होणार आहे. दुपारी 1 वाजता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वनभवनाचे उद्घाटन होणार आहे. तर दुपारी 1.30 वाजता वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. दुपारी तीन वाजता अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे. तर सायंकाळी  5 वाजता मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीयांशी संवाद साधत चहापानाचा कार्यक्रम होईल.


महत्त्वाच्या बातम्या:


Winter Assembly Session : हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण, मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ आज येणार