मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत अनेक महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या जात आहेत किंवा पुढे ढकलल्या जात आहेत. टेनिसमधील सर्वात प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेचं आयोजनही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 134 व्या विम्बल्डन स्पर्धेला जून महिन्यापासून सुरुवात होणार होती. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदा विम्बल्डन स्पर्धेचं आयोजन रद्द करण्यात आलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विम्बल्डन स्पर्धेचं आयोजन रद्द होणार हे निश्चित मानलं जात होतं. आता 134 वी विम्बल्डन स्पर्धा पुढच्या वर्षी 28 जून ते 11 जुलैदरम्यान पार पडणार आहे.
विम्बल्डन स्पर्धा 2 जूनपासून ते 12 जुलै यादरम्यान खेळवली जाणार होती. बुधवारी विम्बल्डन बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या ग्रॅण्डस्लॅमचं आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे सध्याचं जे वातावरण आहे अशा परिस्थितीत विम्बल्डन स्पर्धा भरवणे शक्य नाही, असं बोर्डाच्या वतीने सांगण्यात आलं. याआधी फ्रेन्च ओपनचं आयोजन सप्टेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे. फ्रेंच ओपनचं आयोजन दरवर्षी मे महिन्यात केलं जातं.
इतर स्पर्धांवरही कोरोनाचा परिणाम
कोरोना व्हायरसमुळे टोकिया ऑलिम्पिक स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा जुलै 2021 ते ऑगस्ट 2021 मध्ये पार पडणार आहे. याशिवाय या वर्षअखेर होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवरही कोरोनाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय आयपीएलचं 13 सीजनही जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे.