सातारा: कऱ्हाडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं हाडवैर सर्वांना परिचीत आहे. मात्र आता या दोघांचं मनोमिलन होण्याची चिन्हं आहेत. कारण कऱ्हाडमध्ये काँग्रेस मजबूत व्हावी, त्यासाठी माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांना पक्षात परत घेण्यासाठी काँग्रेसने तयारी दर्शवली आहे. त्याबाबत काँग्रेसमध्ये एकमतही झालं आहे.

याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासकाकांसोबत जुळवून घ्यावे असं पक्षश्रेष्ठींचं म्हणणं आहे.

विलासकाका उंडाळकर हे काँग्रेसचे दक्षिण कऱ्हाड मतदारसंघातून 30 वर्षे आमदार होते. 1980 ते 2009 पर्यंत उंडाळकरांनी या मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं. मात्र  2014 च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने दक्षिण कऱ्हाडमधून उमेदवारी दिल्याने, विलासकाकांनी नाराज होऊन पक्ष सोडला. त्यांनी अपक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाणांविरोधात निवडणूक लढवली.

या निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये विलासकाका उंडाळकरांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. विलासकाकांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या नाकी दम आणला होता. पण शेवटी पृथ्वीराज चव्हाणांनीच निवडणुकीत बाजी मारली होती.

आपल्या संपूर्ण कुटुंबाला पृथ्वीराज चव्हाण यांनी विधी आणि गृहखात्याचा वापर करत अडकवण्याचा प्रयत्न केल्याचं उंडाळकर यांनी म्हटलं होतं.  तर राज्यातल्या काँग्रेसच्या पानिपताला पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार असल्याचा आरोपही विलासकाका उंडाळकर यांनी केला होता.

दक्षिण कराड मतदारसंघातून विजयी होण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी धनशक्तीचा वापर केल्याचा आरोपही विलासकाका उंडाळकरांनी केला होता. त्यामुळं पराभव झाल्यानंतर विलासकाकांनी पृथ्वीराज चव्हाणांवर घणाघात सुरु केल्याचं चित्र होतं.

या सर्व पार्श्वभूमीनंतर आता कऱ्हाडमध्ये पुन्हा काँग्रेसला ताकद देण्यासाठी, विलासकाका आणि पृथ्वीराजबाबा यांच्यातील वैर मिटवण्याचे प्रयत्न पक्षातून होत आहेत.

अशोक चव्हाण यांची भूमिका

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या बळकटीसाठी काहीही करण्यास तयार आहोत, पण या विषयात पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा असं म्हटलं होतं. ते जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल. दोघांचं मनोमिलन व्हावं ही आपली इच्छा आहे, असं अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.