मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून एक महिना चार दिवस झाल्यानंतर अखेर महाराष्ट्राला पर्मनंट मुख्यमंत्री मिळाला आहे. महिन्याभराच्या सत्ता संघर्षानंतर महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री तर मिळाला पण उपमुख्यमंत्र्यांचं काय? महाविकासआघाडीत या पदावरुन रोज नव्या घडामोडी घडताना दिसत आहे. विधानसभेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीला सोडून काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची नवी शक्यता निर्माण झाली आहे.आणि याला कारण आहे राष्ट्रवादीचं अंतर्गत राजकारण. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता आहे.
दोनच दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि राष्ट्रवादीचा एकच उपमुख्यमंत्री पाच वर्षांसाठी असेल. पण अजित पवार यांना हे पद द्यायचं की नाही यावरुन राष्ट्रवादीत मोठा पेच निर्माण झाला आहे. हा तिढा सोडवण्यासाठी हे पद थेट काँग्रेसलाच देऊन त्या बदल्यात विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी घेणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
उपमुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा विधानसभा अध्यक्षावर राष्ट्रवादी का आग्रही झाली ? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अजित पवार यांचं नाराजीनाट्य. भाजपसोबत सत्तासिंचनाचा एक लघुपट केल्यानंतर पुन्हा त्यांनाच उपमुख्यमंत्रिपद दिलं गेलं तर पक्षाच्या विश्वासार्हतेबाबत चुकीचा संदेश जाईल असं अनेकांना वाटतं. तर दुसरीकडे अजित पवारांचे समर्थक मात्र त्यांनाच हे पद दिलं जावं अशी मागणी करत आहेत.
सध्याच्या राजकीय स्थितीत विधानसभा अध्यक्षपदाला बरंच राजकीय महत्व आहे. ज्याच्या हाती विधानसभा अध्यक्षपद त्याच्याकडे सरकारची चावी. त्यामुळेच या पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी त्यावर बराच काथ्याकूट केला.
उपमुख्यमंत्रिपदावरुन होणारी संभाव्य डोकेदुखी सोडवण्यासाठी आता राष्ट्रवादीनं त्या बदल्यात विधानसभा अध्यक्षाला पसंती दिल्याचं दिसत आहे. शिवाय उपमुख्यमंत्रीपद सोडलं तरी राष्ट्रवादी प्रमुख खात्यांवर मात्र नजर ठेवून असणारच आहे. त्यामुळे आता या नव्या घडामोडींवर राष्ट्रवादीतल्या अजित पवार गटाची काय प्रतिक्रिया उमटते हे पाहावं लागेल.
उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसलाच मिळणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Nov 2019 03:42 PM (IST)
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि राष्ट्रवादीचा एकच उपमुख्यमंत्री पाच वर्षांसाठी असेल. पण अजित पवार यांना हे पद द्यायचं की नाही यावरुन राष्ट्रवादीत मोठा पेच निर्माण झाला आहे. हा तिढा सोडवण्यासाठी हे पद थेट काँग्रेसलाच देऊन त्या बदल्यात विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी घेणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -