सोलापूर : भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात महायुतीला (Mahayuti) फक्त 25 जागा मिळत असल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. विदर्भात भाजपला (BJP) 18 जागा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shivsena) 5 जागा व अजित पवार (NCP Ajit Pawar Group) यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळत असून नागपूर जिल्ह्यात भाजपाला फक्त 4 जागा मिळत असल्याचे समजते. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली आहे.  


आज संजय राऊत यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. संजय राऊत म्हणाले की, नांदेडपासून सोलापूरपर्यंत अनेक कार्यक्रम झाले, चांगला प्रतिसाद मिळत आहे. दक्षिण सोलापुरात ही जोरदार तयारी आहे, ही जागा या आधी आम्ही जिंकलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये बसून आम्ही या संदर्भात चर्चा करू. जेव्हा दक्षिण सोलापूरचा विषय येईन तेव्हा त्यावर चर्चा होईल. तोपर्यंत प्रत्येक जागेवर कार्यकर्त्यांना, संभाव्य उमेदवारांना तयारी करायला सांगायला हरकत नसते.  ही जागा महाविकास आघाडी जिंकेल, इथे शिवसेनेचा आमदार असावा ही आमची इच्छा आहे.  राज्यातील चित्र पाहिलं तर आम्ही किमान 170-175 जागा महाविकास आघाडी आणि घटकपक्ष म्हणून जिंकू. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे खासगीत हाच आकडा देतील.  त्यांनी कितीही बाता केल्या तरी वातावरण हे महाविकास आघाडीलच अनुकूल आहे, असे त्यांनी म्हंटले. 


देवेंद्र फडणवीस यांना आताच दम लागलाय


भाजपच्या सर्व्हेबाबत संजय राऊत म्हणाले की,  हा सर्व्हे चुकीचा आहे. त्यांना 25 काय फक्त 12-13 जागा मिळतील. त्यांचाच सर्व्हे चुकीचा असून आकडा फुगवून सांगितलेला आहे.  सगळ्यात जास्त फटका नागपुरात बसत आहे. देवेंद्र फडणवीस यांना आताच दम लागला आहे. फडणवीस यांना निवडणूक सोपी नाही. संपूर्ण विदर्भात आम्ही महाविकास आघाडी म्हणून मेहनत करू. आम्हाला जास्त मेहनत करावी लागेल, आम्हाला विदर्भात यश मिळेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. 


मनसेला ही सुबुद्धी सुचली असेल तर...


पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील गोरगरीब मुस्लीम समाजाला घेऊन दिलीप धोत्रे हे अजमेर शरीफ येथे दर्शनासाठी निघाले आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मनसे वगैरे पक्षांना भूमिका असण्याचे कारण नाही. पण एखाद्या समाजासाठी, मुस्लिमांसाठी अजमेर यात्रा काढत असेल तर त्यात वाईट वाटण्याचे काही नाही.  यामध्ये हिंदुत्व आणि इतर धर्माचा प्रश्न कुठे येतो. मनसेला ही सुबुद्धी सुचली असेल तर मी स्वागत करतो, असे त्यांनी म्हटले आहे.  


भाजपला पूर्ण ऐकण्याची सवय नाही


जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस (Congress) आरक्षण (Reservation) संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही", असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) एका कार्यक्रमात केले. यावरून महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. याबाबत संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांचे आरक्षणाबाबत वक्तव्य भाजपने नेहमीप्रमाणे मोडून तोडून समोर आणले आहे. आरक्षण रद्द करू असे राहुल गांधी म्हणाल्याचे माझ्या वाचनात नाही. त्यांची मुलाखत मी संपूर्ण ऐकली, भाजपला पूर्ण ऐकण्याची सवय नाही. त्यांना हवं तेच भाजप ऐकते आणि बाकीचे तोडून मोडून फेकून देतात, काँग्रेसची आरक्षणाविषयी भूमिका मला माहिती आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती की, जो पर्यंत समजात विषमता आहे, समान न्यायाचे तत्व लागू होतं नाही तोपर्यंत आरक्षण राहील,  अशा प्रकारची भूमिका आमच्या सर्वांचीच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


घटनाबाह्य गोष्टींना न्यायालय संरक्षण देतंय


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपती पूजनासाठी गेले होते. यावरही संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, जोपर्यंत चंद्रचूड त्या खुर्चीवर आहेत. तो पर्यंत आम्हाला न्याय मिळेल, असं वाटत नाही. सरन्यायाधीश हे संविधानाचे राखवालदार, चौकीदार आहेत. राज्यातील सरकार हे अमित शाह, मोदींच्या प्रेरणेने आले, संविधान विरोधी हे सरकार आहे. पण ज्या पद्धतीने काल मोदींसोबत त्यांनी आरती केली त्यातून संदेश स्पष्ट आहे की, घटनाबाह्य गोष्टींना न्यायालय संरक्षण देत आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. 


आणखी वाचा 


मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?