सांगली : सांगली शहरात स्वच्छता राखली जावी, यासाठी महापालिका आयुक्तांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. शहरात शौचालये नसणाऱ्या दीड हजार जणांना पालिकेने चांगलाच फटका दिला आहे. दीड हजार जणांची वीज, नळ कनेक्शन तोडली जाणार असून, गॅस कनेक्शन आणि रेशनिंग दुकानातून शिधापुरवठाही बंद केला जाणार आहे. सांगली महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी याबाबत माहिती दिली.


 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आयुक्त खेबुडकर यांची ‘स्वच्छ भारत’ अभियानाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स पार पडली. या कॉन्फरन्सनंतर आयुक्तांनी कारवाईच्या निर्णयाची माहिती दिली. येत्या गुरुवारपासूनच कारवाईच्या अंमलबजावणीला सुरुवात केली जाणार असल्याचीही माहिती आयुक्तांनी दिली.

 

“गेल्या वर्षभरापासून व्यक्तिगत आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणीचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे, व्यक्तिगत शौचालये बांधण्यासाठी सरकारकडून 6 हजार रुपयांचे प्रत्येकी दोन हप्ते अनुदानही दिले गेले आहेत.”, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

 

आयुक्तांनी सांगितले की, “सांगली महापालिकेने शहरातील 266 कुटुंबांना पहिला 6 हजार रुपयांचा हप्ता दिला आहे. मात्र, 7 - 8 वेळा नोटीस बजावूनही या कुटुंबांनी शौचालयाचं बांधका केलेलं नाही. शिवाय, शहरातील दीड हजारहून अधिक नागरिकांनी पालिकेककडे अर्जही केलेला नाही. या सर्वांवर एकदाच कारवाई शक्य नाही. त्यामुळे टप्प्या-टप्प्यानं नळ, वीज कनेक्शन तोडण्यचे आदेश संबंधित कंपनींना देऊ. शिवाय, गॅस आणि रेशनिंगही बंद करणार आहोत.एवढ्या कारवाईनंतरही जर शौचालये बांधली नाहीत तर फौजदारी कारवाई करावी लागेल.”