Jitendra Awhad on Ajit Pawar : मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री (Chief Minister) झाले तर आनंद होईल, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. राजकीय वैमनस्य नसतं, वैचारिक मतभेद असतात. त्यांनी हे समजून घ्यायला हवं, आपलं वैर नाही शेतीमातीचं भांडण नाही, असं ते म्हणाले आहेत. तसेच, आम्ही त्यांच्यासोबत गेलो नाही, त्यामुळे आम्हाला निधी दिला जात नाही, अशा पद्धतीनं वागवलं जातंय आम्हाला. एक रुपयाचा निधीही आम्हाला दिलेला नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तसेच, यावेळी बोलताना आव्हाडांनी राम मंदिराबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले की, "राम यांची पर्सनल प्रॉपर्टी नाही, निवडणुका जवळ आल्या की, यांनी रामाचा बाजार मांडला आहे, हे मागील 70 वर्ष सुरू आहे."
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, "तीन राज्यांच्या निवडणुकांनंतर भाजप मधल्या कार्यकर्त्यांचं मत झालं आहे की, आता आपण कशाला कुणाचा आधार घ्यायचा. आपल्या फोडाफोडीमुळे जनता नाराज आहे. आपल्या वैचारिक आजारावर जनता जर आपल्या सोबत असेल, तर कशाला इतरांना सोबत घ्यायचं, अशी भावना आहे. त्यांचा कोर व्होटर दुसऱ्याला सोबत घेतलं की, नाराज होतो, याच उदाहरणं म्हणजे, पुण्याची निवडणूक आहे. तिथं कोर व्होटर नाराज झाला आणि त्यामुळे रवींद्र धंगेकर निवडून आले."
अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंद होईल : जितेंद्र आव्हाड
"अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंद होईल. राजकीय वैमनस्ये नसतं वैचारिक मतभेद असतात. त्यांनी हे समजून घ्यायला हवं आपलं वैर नाही शेतीमातीचे भांडण नाही. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नाही, त्यामुळे आम्हाला निधी दिला जात नाही, अशा पद्धतीनं वागवला जात आहे. आम्हाला एक रुपया निधी देखील दिला नाही.", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "आम्हाला मुख्यमंत्री यांनी निधी वाटपासाठी वेळ दिला, पण तो लॉबीत दिला. विरोधी पक्षाची लायकी लॉबीत आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. चाळीस वर्ष ज्यांनी विधिमंडळात काम केलं, त्यांना निरोप आला की, लॉबीत येऊन भेटा."
राजीव गांधी गेले, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं : जितेंद्र आव्हाड
"या उलट काँग्रेसची संस्कृती पाहीची म्हटलं तर एक उदाहरण घेता येईल, अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेते असताना आजारी पडले होते आणि त्यांना ऑपरेशनसाठी अमेरिकेला जायचं होतं. परंतु, त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यावेळी राजीव गांधी यांनी त्यांना अमेरिकेला जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करायला सांगितलं आणि त्यांना अमेरिकेत पाठवून त्यांचे पूर्ण उपचार केले. ज्यावेळी राजीव गांधी गेले, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, त्यांनी स्वतः आपल्या भाषणात हा किस्सा सांगितला होता.", असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
"आपण ज्यावेळी एक असतो, त्यावेळी निर्णय एक व्हायला हवा. ज्यावेळी आपण जेवायला बसतो, त्यावेळी आपल्याबरोबर असणाऱ्याला काहीच मिळालं नाही आणि त्यावेळी आपण भरपेट जेवणं हे माणुसकीला धरून नाही.", असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे.
"मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आयुक्तांना अनधिकृत बांधकामा संदर्भात फोन केला, असं म्हटलं आहे. मात्र, माझा प्रश्न हा आहे की, ठाण्याचे महापालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांचं ऐकणार का? मुख्यमंत्र्यांनी फोन केला आणि आयुक्तांनी ऐकलं नाही तर तुम्ही काय करणार आणि मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता, हे आयुक्त नाकारू शकत नाही. कारण तो फोन माझ्यासमोर केला होता. त्यांनी हे देखील सांगितलं की, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना अटक करा.", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.