सांगली : पतीच्या आजारपणाला कंटाळून आणि पती चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या रागातून पत्नीने पतीची गळा चिरुन हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सांगलीच्या तासगावमध्ये हा खुनाचा प्रकार घडला असून पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला तासगाव पोलिसांनी अटक केली आहे.
सांगलीच्या तासगावमधील इंदिरानगरमध्ये पतीचा खून करून आत्महत्येचा केलेला बनाव तासगाव पोलिसांनी उघडकीस आणला आहे. खून करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. कल्लापा उर्फ कल्लू शिवाजी बागडी (40)या व्यक्तीचा त्याच्याच पत्नीने गळा चिरुन खून केला आहे. कल्लापा याला क्षयरोग होता, तसेच कल्लापा त्याची पत्नी शांताबाई बागडी हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. त्यामुळे शांताबाईने रागाच्या भरात हा खून केल्याचे उघडकीस आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून कल्लू बागडी क्षयरोगाने त्रस्त होता. त्यातून त्यांची सतत चिडचिड होत होती. याच चिडचिडीतून तो पत्नी शांताबाई हिच्यावर चारित्र्यावरुन संशय घेत होता. बुधवारी रात्री बाराच्या सुमारास त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वादावादी झाली. यावेळी "मी आत्महत्या करतो", असे सांगून घरातील चाकूसारखे धारदार शस्त्र घेऊन कल्लू घरातून बाहेर पडला. घराच्या मागे असणार्या खोलीत गेला. त्यावेळी पत्नी शांताबाईही त्याठिकाणी आली. कल्लूने चाकू गळ्याला लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली. यावेळी शांताबाईने "तू कशाला मरतो, मीच तुला मारते", असे म्हणून चाकू धरण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत कल्लूच्या गळ्याला चाकू लागला आणि कल्लू रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी शांताबाईने आणखी एकदा त्याच ठिकाणी चाकूने जोरदार वार केला. ज्यामध्ये कल्लूचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर सकाळी शांताबाईने आरडाओरड करुन नवरा सापडत नसल्याची आवई उठवली. त्यानंतर काही वेळाने घराच्या मागील खोलीत नवरा मरुन पडला असल्याचे दिसून आल्याचे नाटक केले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास शांताबाई हिने स्वतः पोलिसांत जाऊन नवर्याने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती दिली. परंतु पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपास सुरू केला. ज्यामध्ये घटनास्थळावरील वातावरण व परिस्थिती पाहता पोलिसांना खुनाची शंका आल्याने शांताबाई हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. दरम्यान आपणच खून केल्याचे शांताबाई बागडी हिने कबूल केल्याचे तासगाव पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सांगलीत पत्नीकडून पतीची गळा चिरुन हत्या, आत्महत्येचा बनाव उघडकीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2019 09:04 AM (IST)
पतीच्या आजारपणाला कंटाळून आणि पती चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या रागातून पत्नीने पतीची गळा चिरुन हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -