लातूर : गुन्हा आज ना उद्या उघड होत असतो याची प्रचिती लातूर जिल्ह्यातील एका खुनाच्या घटनेत समोर आली आहे. एक कोटी रुपयांच्या विम्याच्या रकमेसाठी खून झाला होता. याप्रकरणी दोन आरोपींना अटक झाली होती. मात्र, घटनेच्या 8 वर्षानंतर यातील तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीनेच पतीच्या खुन्यांना मदत केल्याची माहिती उघड झाली आहे.


ही घटना आहे 27 जुलै 2012 सालची. या दिवशी अण्णाराव बनसोडे यांचा खून झाला होता. मात्र, यासाठी काही वर्षांपूर्वी योजना तयार करण्यात आली होती.


काय होती योजना?
अण्णाराव बनसोडे फर्निचरचे काम करणारा अल्प उत्त्पन्न असलेला कारागीर होता. लातूर जिल्ह्यातील सुमठाणा या गावाचा तो रहिवासी होता. दिवसभर काम करून त्याच्या हातात पन्नास रुपये पडत होते. याच काळात रमेश विवेकी या विमा एजंटने त्यास हेरले. त्यास मोठी आमिषे दाखवत लातुरात फर्निचरचे दुकान उघडण्यात आले. अनेक कागदपत्रांवर सही घेण्यात आल्या. अण्णाराव यांचा एक कोटींचा विमा उतरविण्यात आला. काही महिने हफ्तेही भरण्यात आले. वारसदार होती त्याची पत्नी ज्योती. या सगळ्या योजना विमा एजंट रमेश विवेकी यांच्या गुन्हेगारी वृत्तीने तयार झाल्या होत्या. येथेपर्यंत रमेश विवेकीची योजना सफल झाली होती. आता वेळ होती अण्णारावचा अपघात दिसेल असा खून करण्याची.


असा केला खून
नायगाव भुसनी रस्त्यावर 29 /07/2012 रोजी खून करण्याचा डाव आखण्यात आला. रमेश विवेकी यांनी त्याचा साथीदार गोविंद सुबोधी याच्यावर हे काम सोपवले. अण्णाराव आणि सुबोधी हे दोघे ठरलेल्या ठिकाणी आल्यावर योग्यवेळ साधून सुबोधीने अण्णारावच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. त्यात अण्णाराव जागीच मृत झाला. दुचाकीची लाईट फोडून अपघाताचा बनाव रचला. अपघात झाल्याची माहिती घरी कळवली. लातूरच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या बाबत औसा पोलिसात अपघाती निधन झाले अशी नोंद करण्यात आली. या कामी औसा पोलीस ठाण्यातीळ काही कर्मचारी आणि खोटे साक्षीदार तयार करण्यात आले होते. पोलीस ठाण्यात त्यांच्या योजनेनुसार घटनाक्रम दाखल झाला होता. यामुळे रमेश विवेकी एक कोटी मिळविण्यासाठी कामाला लागला.


असा फसला डाव
विमा कंपनीने कागदपत्रे तपासणी सुरू केली. औसा पोलीस ठाणे, घटनास्थळ पाहाणी केली. यातील साक्षिदार यांना घटनेची माहिती विचारली त्यावेळी शंका आल्याने त्यांनी औसा पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली. औसा पोलिसांनी घटनाक्रम तपासला. औसा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्या कारणाने खुनाचा अपघात दाखविण्यात रमेश विवेकी यशस्वी झाला होता हे उघड झाले. पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवली आणि रमेश विवेकीचा कट उधळला गेला. मे 2014 मध्ये घटनेतील सत्य समोर आले. रमेश विवेकी आणि गोविंद सुबोधी यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या.


कोण होता रमेश विवेकी
मास्टर माईंड विमा एजंट रमेश विवेकी हा साहित्यिक आहे. त्याचा एक कथा संग्रह आणि दोन कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्याने एक मराठी चित्रपट निर्मिती केली आहे. प्रकाश नगर लातूर येथे त्याचे तीन मजली घर आहे. त्याचा कोणता व्यवसाय आहे हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र, श्रीमंती बडेजावात तो राहत होता. उत्तम भाषाशैली आणि राहणीमान यामुळे त्याच्यावर कोणाचा संशय गेला नाही. त्यानेच गोड बोलून अण्णारावची पत्नी ज्योतिस कटात सहभागी करून घेतले असा आरोप अण्णारावच्या भावाने केला होता.


आठ वर्षांनी आले पत्नीचे नाव


या खटल्यातील सर्व तपास संपला. कोर्टात प्रकरण दाखल आहे. कोर्टाने अण्णाराव यांच्या भावाच्या तक्रारीत ज्योती वरील संशय व्यक्त केला होता. त्या तपासातील कागदपत्रे मागवली. मात्र, पोलिसांनी यात तपास केला नव्हता. कारण ज्योतीने आपल्या पतीचा घात करून हत्या केल्याची तक्रार दिली होती. कोर्टाने नव्याने तपास करण्याच्या सूचना दिल्या. ज्योतीने विमाच्या हफ्त्यातील 20 लाखांपैकी 18 लाख उचलले होते. तपासात ही रक्कम उचलताना विवेकी बरोबर असल्याची माहिती मिळाली. रमेश विवेकी याने तिला वारसदार केले होते. तिला पैसे मिळाल्यावर त्यात तोही हिस्सेदार राहिला असता. यावरून पुन्हा तपासाची चक्रे फिरली. यावरून ज्योतिस पोलिसांनी अटक केली आहे. आठ वर्षानंतर पतीच्या खुनात सहभागी असलेली ज्योती गजाआड गेली आहे. पुढील तपास लातूर पोलीस करत आहेत.


संबंधित बातम्या : 


बायकोसाठी काय पण...! वसईत पत्नीला शोधण्यासाठी गाड्या चोरणारा जेरबंद