सांगली : सांगलीमध्ये लग्नाच्या रुढी परंपरेचे बंधन तोडून एका विधवेचे तिच्या सख्खा दिराशी लग्नाचे अनोखे बंधन बांधण्याची क्रांतिकारक घटना घडली आहे. हा विवाह समाजाला एक नवी दिशा देणारा असल्याचे म्हणत गावकऱ्यांनी या तरुणीचे आणि तिच्या कुटुंबीयांचे कौतुक केले आहे.
दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील दत्तात्रय पाटील यांची कन्या सोनाली हिचा सांगलीतील शिरगाव गावातील नामदेव पाटील यांचा मुलगा संतोष याच्याशी विवाह झाला होता. सोनालीचे लग्न होऊन दोन वर्षे झाली होती. तिला एक सहा महिन्यांची मुलगीदेखील आहे. परंतु काही महन्यांपूर्वीच तिच्या पतीचे (संतोष) अकाली निधन झाले.
सोनालीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशा परिस्थितीमध्ये सोनालीला तिची आणि तिच्या सहा महिन्यांच्या मुलीच्या पुढील आयुष्याचा प्रश्न पडला होता. आपल्या मुलीच्या भविष्याचे काय होईल? या चिंतेने सोनालीच्या माहेरचे व्यथित होते. परंतु अशा परिस्थितीत सोनालीच्या सासरच्या मंडळींनी एक धाडसी निर्णय घेण्याचे ठरवले. त्यांनी सोनालीच्या पतीच्या धाकटया भावाशी म्हणजेच दिराशी (उमेश पाटील)लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. उच्चशिक्षित असणाऱ्या पाटील कुटुंबातील महिलांनी हा विचार पुढे आणत लग्नाच्या रूढी परंपरा मोडीत काढल्या आहेत.
संतोषच्या आई आणि सोनालीच्या सासू राजश्री पाटील यांना त्यांची सहा महिन्याची नात आणि सून सोनालीच्या भविष्याची चिंता होती. सोनालीला आयुष्यभर सांभाळण्याचा निर्णय राजश्री यांनी केला होता. परंतु घरात आपला लग्नाचा एक मुलगा आहे, आणि उद्या त्याचे लग्न झाल्यावर येणारी सून मोठ्या मुलाच्या मुलीला आणि त्याच्या विधवा पत्नीला प्रेम देईल का? शिवाय दोन्ही सुनांमध्ये नातेसंबंध कितपत चांगले राहतील का? या विचारातून पुरोगामी असणाऱ्या राजश्री पाटील यांनी आपल्या धाकट्या मुलाशी सोनालीचे लग्न लावून देण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांचा निर्णय त्यांनी धाकटा मुलगा उमेश आणि सून सोनाली हिच्यासमोर मांडला. या निर्णयाला सोनालीसह तिच्या माहेरच्या मंडळींनीदेखील होकार दिला. नुकतेच साध्या पद्धीने सोनाली आणि उमेश यांचा विवाह पार पडला आहे.
उमेश आणि सोनाली या नवदाम्पत्याने त्यांचा नवा संसार चिमुकलीसोबत थाटात सुरु केला आहे. या लग्नामुळे आपल्या अंधारमय जीवनात पुन्हा प्रकाश पडला असून पाटील यांच्या घरची सून झाल्याने आनंद होत असल्याची भावना सोनालीने व्यक्ती केली. शिवाय आपल्या मोठ्या भावाची मुलगी आपल्याच घरी राहील, ही भावनासुद्धा आपल्या मनात होती. असे मत उमेशने (संतोषचा धाकटा भाऊ) यावेळी व्यक्त केले.
विधवा वहिनीशी दिराने बांधली लग्नगाठ, कुटुंबाच्या पुढाकाराने विवाह
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Mar 2019 08:44 PM (IST)
सांगलीमध्ये लग्नाच्या रुढी परंपरेचे बंधन तोडून एका विधवेचे तिच्या सख्खा दिराशी लग्नाचे अनोखे बंधन बांधण्याची क्रांतिकारक घटना घडली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -