अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आघाडीला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांमध्ये वाढ होत आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक मधुकर पिचड आणि अकोले मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड 30 जुलैला भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आली.  राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय.


अहमदनगर जिल्ह्यातील नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आता अकोले विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार  वैभव पिचड यांनीही भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यानं काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे अहमदनगर जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असताना त्यांच्याच जिल्ह्यातील आघाडीचे नेते भाजप सेनेच्या गळाला लागत असल्यानं थोरात यांच्या पुढेही मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

काय म्हणाले आमदार वैभव पिचड
आयुष्यात काही निर्णय घ्यायचे असतात. गेल्या 35 वर्षात मधुकर पिचड यांनी खूप काम केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला आम्ही भक्कम साथ दिली. माझ्या आमदारकीपेक्षा जास्त मतं यावेळी दिली. मात्र गेल्या पाच वर्षांपासून अकोले तालुक्याचा विकास रखडला असून रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक विकासाच्या योजना विरोधी पक्षात असल्यानं पूर्ण होत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला यश मिळालं आणि आगामी विधानसभेत हेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल अशी भावना कार्यकर्त्यांची झाली असून तालुक्याचा विकास व्हावा ही जनतेची भावना ओळखून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं आमदार वैभव पिचड यांनी सांगितलं.

काय म्हणाले मधुकर पिचड
आतापर्यंत तुम्ही साथ दिली. प्रेम दिलं म्हणून काम करू शकलो. माझ्यावर अनेकदा व्यक्तिगत टीकाही झाली. आजपर्यंत सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतलाय.  देश बदलला आहे. आदरणीय मोदींमुळे विकासाची चर्चा होतेय. परिवर्तनाच्या बाजूनं पाऊल पडत असताना आपण ही त्याच बाजूनं जावं हा निर्णय घेतला. शरद पवारांची आजपर्यंत मला साथ दिल्यानंतर अनेक काम झाली. त्यांना मी विसरू शकत नाही. मला आता काही मिळवायचं नाही मात्र जे चांगलं आहे त्या बाजून राहायचं असा विचार केलाय. स्थानिक भाजप नेत्यांनीही आम्हाला साथ देण्याचं आश्वासन दिलं आहे, ही भावना मधुकर पिचड यांनी बोलून दाखविली.

मी मुख्यमंत्र्यांशी बोललो. प्रदेशाध्यक्ष पाटील यासह अनेकांशी बोललो सर्वांनी सकारात्मक साथ देण्याचं आश्वासन दिलं. आमदार वैभव आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असून मी सुद्धा भाजपात जाणार आहे, असे मधुकर पिचड म्हणाले.

पिचड पिता पुत्रांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपची ताकद वाढणार असली तरी अकोले मतदारसंघात स्थानिक राजकारण मात्र वेगानं बदलणार असल्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत पिचड यांना विरोध करणारे नेते भाजप शिवसेनेत आहेत. आता पिचड यांच्या प्रवेशानंतर ह्या विरोधकांची मनं जुळणार का हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.