देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्याची एसटी सेवा देखील बंद होती. 18 मार्च पासून टप्याटप्याने एसटी वाहतूक सेवा बंद करण्यात आली. मध्यंतरी जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु करण्यात आली होती, मात्र पुरेसे प्रवासी उपलब्ध न झाल्याने बहुतांश फेऱ्या रद्द करण्याची वेळ महामंडळावर येत होती. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात एसटी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आजपासून ही वाहतूक अखेर सुरू झाली आहे, ठिकठिकाणी उत्साहाच्या वातावरणात तर काही ठिकाणी मर्यादित प्रवासीसंख्या असताना देखील एसटी सुरू झालीय.
मात्र अशातच सोशल मीडियावर एक मेसेज सध्या चांगलाच वायरल होतोय, "अनोळखी लोकांसोबत एसटी बस मधून प्रवास करताना E pass लागणार नाही, पण तुम्ही तुमच्या गाडीत तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत प्रवास करत असाल तर मात्र E pass ? ?" हा मेसेज व्हॉट्सअॅपवर सध्या चांगलाच वायरल होतोय. एसटीमध्ये प्रवास करण्यासाठी नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाहीय. तर खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी देखील हा ई-पास रद्द करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.
राज्यातील सर्व सीमांवर सध्या नाकाबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी या नाक्यांवर केली जातेय. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर देखील अशाच पद्धतीने नाकाबंदी करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या प्रतिनिंधीनी काही नागरिकांशी संवाद साधला असता एसटीला पास नाही आणि खासगी वाहनांना मात्र पास बंधनकारक असल्यावरुन काही जणांनी नाराजगी व्यक्त केली.
"एसटी महामंडाळाच्या गाडीतून प्रवास करणारे हे सुरक्षित आणि खासगी गाडीतून प्रवास करणारे असुरक्षित असं असू शकत नाही. कोरोना कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनाच पास बंधनकारक करावे अन्यथा कोणालाच पासची सक्ती करु नये" म्हणत अनेक प्रवाशांनी सरकारच्या या भूमिकेवरुन नाराजी व्यक्त केली. ई पास बाबत घेतलेला निर्णय हा विरोधाभासी असल्याचं मत प्रवाशांनी व्यक्त केलं.
ई-पास काढण्यासाठी नागरिकांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. राज्यात सर्व काही पूर्वपदावर येत असल्याने अशा पद्धतीने पासची सक्ती करण्यात येऊ नये अशी प्रवाशांची भावना आहे. दरम्यान ई-पास बंधनकारक केल्यामुळे काही जण याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील काही ठिकाणी बोगस पास बनवणारी टोळी कार्यरत आहे. ज्यांना वेळेवर पास मिळत नाही अशा प्रवाशांना ही टोळी बोगस पास मिळवण्यात मदत करत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे सोलापूर शहर संपर्क प्रमुख जमीर यांनी केला आहे. राज्यभरातून या प्रकरणी अनेक तक्रारी करण्यात आल्या आणि अनेकांना या कृत्यामुळे अटकही झाली.
दरम्यान नाकाबंदीवेळी कित्येक प्रवासी अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करत असतात. मात्र अशावेळी त्यांच्याकडे पास असेलच अशी परिस्थिती नसते. त्यावेळी त्यांना पास नसल्यास देखील प्रवेश द्यावा लागतो. तर काही वेळेस पास नसणारे काही लोक सुसाट गाडी चालवत, नाकाबंदीला लावण्यात आलेले बॅरिकेडसुद्धा तोडून पळून जातात. रात्रीच्यावेळी नाकाबंदी करत असताना अशा लोकांमुळे इतर प्रवाशांना धोका निर्माण होत असल्याची भावना नाकाबंदीवर ड्युटी करत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने व्यक्त केली. त्यामुळे ई-पास केवळ सोपस्कार म्हणून किंवा कर्मकांडापुरतेच मर्यादित राहिल्याची स्थिती दिसून येत आहे.
संबंधित बातम्या