औरंगाबाद : औरंगाबादकरांना सध्या पाकिस्तानची माती खाण्याची सवय लागली आहे. माती खाणाऱ्यांमध्ये महिला, तरुणी अग्रेसर आहेत. औरंगाबादकर थोडी-थोडकी नाही तर वर्षाला तब्बल 16 टन माती रिचवत आहेत. पाकिस्तानच्या मुलतानमधून आलेले हे भाजक्या मातीचे खडे गुजरात, राजस्थानमधून ट्रक भरुन औरंगाबादच्या जुन्या मोंढ्यात पोहोचले आहेत.
ही माती शहरातील वेगवेगळ्या किरणा दुकानात विकली तर जातेच, शिवाय ती चवीने खाल्लीही जाते. ही मुलतानी माती असते. राखाडी रंगाची भाजकी माती खाण्यासाठी वापरली जाते. ही भाजकी माती हलक्या-भारी प्रतीनुसार 500 ते 1 हजार रुपयांपर्यंत एक पोते या दराने विकली जाते. किरकोळ विक्रीत 20 ते 40 रुपये किलोने मातीचे खडे मिळतात. एका दुकानातून दररोज 5 ते 10 किलोपर्यंत भाजकी माती विकली जाते. काही जण दररोज साधारणत: 20 ग्रॅम ते 50 ग्रॅमपर्यंत मातीचे खडे खातात. यात महिला, तरुणी आणि पुरुषांनाही माती खाण्याचं व्यसन लागलं आहे.
पण प्रश्न असा आहे की औरंगाबादकर ही माती का खात आहेत? यावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सविता पानट सांगतात की, "माती खाणं जसं व्यसन आहे तसं माती खाणारे 'पिका' या मानसिक आजाराने ग्रासलेले असतात. आयर्न, फॉलिक अॅसिडच्या कमतरतेने महिलांना माती खाण्याची सवय लागते. शहरातील 60 तर ग्रामीण भागातील 80 टक्के महिलांना अॅनिमिया असतो. आयर्नच्या कमतरतेमुळे 30 टक्के महिला माती खातात. माती खाल्ल्याने गरोदर महिलांची अपूर्णकालीन प्रसूती होणे, बाळाचे वजन कमी भरणे, तसेच प्रसूती काळात हृदयदाब वाढणे, अशा तक्रारी येण्याची शक्यता असते.
खरंतर शास्त्रीयदृष्या सुरक्षित असलेल्या बाजारात कॅल्शियमच्या गोळ्या असतात, पण त्यापेक्षा मातीखाण्याकडेच बायकांचा कल आहे, असं आयुर्वेद चिकित्सक डॉ. संतोष नेवपूरकर यांनी सांगितलं. "निसर्गाच्या प्रत्येक घटकात औषधी गुण असतात. मातीतही औषधी गुण आहेत. आजही गेरुचा वापर आयुर्वेदात औषधी म्हणून केला जातो. पण आता कॅल्शियमच्या गोळ्या आल्या आहेत. शरीरातील लोहाचे कमी प्रमाण त्याने भरुन निघते," असं डॉ. संतोष नेवपूरकर म्हणाले.
मात्र, कोणतीही गोष्ट खाताना तारतम्य बाळगा, माती खाऊन आरोग्याची माती करु नका, अन्यथा आयुष्याची माती होईल, असा सल्ला जाणकार देत आहेत.
16 टन माती, औरंगाबादकर पाकिस्तानची माती का खात आहेत?
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
12 Jul 2018 04:20 PM (IST)
ही माती शहरातील वेगवेगळ्या किरणा दुकानात विकली तर जातेच, शिवाय ती चवीने खाल्लीही जाते. ही मुलतानी माती असते. राखाडी रंगाची भाजकी माती खाण्यासाठी वापरली जाते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -