मुंबई  : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून आपल्याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर (Raja Thakur) आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची खासदार श्रीकांत शिंदे ( shriknat shinde ) यांच्याकडून सुपारी देण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली असून त्यांनी उल्लेख केलेला राजा ठाकूर कोण आहे याची आता चर्चा होत आहे.  


कोण आहे राजा ठाकूर?


ठाणे-बेलापूर रस्त्यावर कळवा येथील विटावा ब्रिजखाली जानेवारी 2011 मध्ये दीपक पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा प्रमुख आरोपी रविचंद ठाकूर उर्फ राजा ठाकूर होता. या प्रकरणी राजा ठाकूल याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जन्मठेप सुनावल्यानंतर राजा ठाकूर एप्रिल 2019 पासून जामीनावर बाहेर होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजा ठाकूर पुन्हा पोलिसांसमोर हजर न होता फरार झाला होता. त्याला ऑक्टोबर 2019 मध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने येऊरच्या साई धाबा येथे सापळा रचून बेड्या ठोकल्या होत्या.


पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर त्याला पुन्हा जामीन मिळाला. पुन्हा जामीनावर सुटलेल्या ठाकूर याने राजाश्रय मिळवला. या काळात ठाण्यातील शिंदे गटाच्या महत्वाच्या नेत्यांचा निकटवर्तीय अशी ओळख निर्माण करत त्याने ठाण्यात पुन्हा दहशत निर्माण केली. त्यातून होणारे अर्थकारण आणि पुढे सामाजिक ओळख जपण्याचा प्रयत्न ठाकूर गँगने सुरु केला. याचदरम्यान अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी ठाण्यात शिंदे पितापुत्रांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाकूर याने भव्य कबड्डी सामान्यांचे आयोजन करत शहरभर शिंदे यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग झळकवले होते. त्यावेळीपासून राजा ठाकूर चर्चेत आला आहे. त्यात आता संजर राऊत यांनी आरोप केल्याने राजा ठाकूर पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. 


संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी


खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी ही सुपारी राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.   


महत्वाच्या बातम्या 


Sanjay Raut: संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी, श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिल्याचा आरोप