मुंबई: शिवसेनेतील कलह आता वेगळ्याच वळणावर पोहोचला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 


खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 


 






संजय राऊत यांनी या प्रकरणी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनाही पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत अनेकांची नावं असल्याची माहिती आहे. या सर्वांकडून आपल्याला धोका असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. 


राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही: आदित्य ठाकरे


या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. गद्दार आमदारांनी माहिमध्ये गोळीबार केला, त्याची नोंदही पोलिस ठाण्यात आहे. काही आमदारांनी मारहाण केली, त्यांच्यावर कारवाई केली नाही. या सगळ्यावरुन राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलीय की नाही असा सवाल उपस्थित होतोय."


ही राजकीय स्टंटबाजी: संजय शिरसाठ यांचा राऊतांवर निशाणा


जर चौकशीत तसं काही आढळलं नाही तर त्यांच्यावर मानहाणीचा दावा करण्यात येईल. याची चौकशी झालीच पाहिजे. पण ही केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याचं दिसतंय असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केला. 


एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे, दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं आहे, अशाच तापलेल्या राजकीय वातावरणात आता खासदार संजय राऊत यांनी हा आरोप केला आहे. त्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद आता कोणत्या दिशेला जात आहे याची प्रचीती येत आहे.



ही बातमी वाचा: