उस्मानाबाद : जलयुक्त शिवारा संदर्भात जी काही चौकशी राज्य सरकारला करायची आहे, ती त्यांनी जरूर करावी, असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकी निर्णय घेण्यात आला होता. तसेच एसआयटीमार्फत ही चौकशी होणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. त्यामुळे यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलताना जलयुक्त शिवारा संदर्भात म्हणाले की, 'जलयुक्त शिवारा संदर्भात जी काही चौकशी राज्य सरकारला करायची आहे, ती त्यांनी जरूर करावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही काही मंत्रालयात सह्या करून टेंडर दिलेली कामं नाहीत. सहा लाख कामं त्याठिकाणी झाली आहेत. या सहा लाख कामांपैकी सर्व कामं ही विकेंद्री पद्धतीनं झाली. जिल्हाधिकारी याचे प्रमुख होते. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेने, कृषी विभाग, जलसंधारण विभाग, वन विभाग यासर्व विभागांनी कामं केली. साधारणपणे अॅव्हरेज एक लाखांपासून ते पाच लाखांपर्यंतची ही कामं आहेत. स्थानिक लेव्हलवरच याचे टेंडर्स निघाले आहेत आणि ही कामं करण्यात आलेली आहेत.'
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'यासंदर्भात बोलताना मी मंत्र्यांचं ऐकलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, 700 तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. सहा लाख कामांमध्ये सातशे तक्रारी मला असं वाटतं की, अर्धा टक्का देखील नाही. म्हणजे, एकही टक्का तक्रारी येऊ नयेत. पण साधारणपणे जी काही सरकारी कामं होतात त्यात पाच ते सात टक्के तक्रारी किमान असतात. सहा लाख कामं होऊन अर्धा टक्काही तक्रारी त्यामध्ये आलेल्या नाहीत. त्यामुळे जाणीवपूर्वक याठिकाणी चौकश्या लावल्या जात आहेत.'
'मी सरकारला एवढंच सांगू इच्छितो, जर सरकारला असं वाटत असेल की, अशाप्रकारे चौकश्या लावून विरोधी पक्षनेत्याचं तोंड बंद करता येईल, तर त्यांनी ते विसरून जावं. विरोधी पक्षनेता हा जनतेचा आहे. तो जनतेकरताच काम करत राहणार आहे. शेतकऱ्यांवर आलेलं संकट संपू द्या. जलयुक्त शिवार योजनेचा किती मोठ्या प्रमाणात फायदा झाला, हे आम्ही प्रत्येक गावात, तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांचं मत नोंदवणार आहोत. त्याचं आम्ही प्रदर्शनच मांडणार आहोत.', असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या :
नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलं नाही, मुख्यमंत्र्यांकडून दिलासा नाही : देवेंद्र फडणवीस