नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ सी-60 कमांडो फोर्स काय आहे?
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2018 11:01 AM (IST)
रविवारी पहाटे नक्षलवाद्यांवर हल्ला चढवत पहिल्या कारवाईत 16 जणांचा खात्मा केला होता, या हल्ल्यात जखमी अवस्थेत पळून जात असलेल्या 15 नक्षलवाद्यांचे मृतदेह नदीत आढळले. ही कारवाई केली आहे गडचिरोली पोलिसांच्या फोर्सने, ज्याला सी-60 कमांडो असं म्हटलं जातं.
गडचिरोली : भारताच्या इतिहासातलं नक्षलवाद्यांच्या विरोधातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन गडचिरोलीत झालं. गडचिरोलीच्या सी-60 जवानांनी 37 नक्षलवाद्यांचा खात्मा करत मोठं यश मिळवलं. रविवारी पहाटे नक्षलवाद्यांवर हल्ला चढवत पहिल्या कारवाईत 16 जणांचा खात्मा केला होता, या हल्ल्यात जखमी अवस्थेत पळून जात असलेल्या 15 नक्षलवाद्यांचे मृतदेह नदीत आढळले. पहिल्या ऑपरेशननंतर राजाराम खानाला परिसरात सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला. राजाराम कोरेपल्ली जंगलात हे ऑपरेशन पार पडलं. महत्त्वाचं म्हणजे, या ऑपरेशनमध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर नंदू याला ठार करण्यात जवानांना यश आलं. ही कारवाई केली आहे गडचिरोली पोलिसांच्या फोर्सने, ज्याला सी-60 कमांडो असं म्हटलं जातं. काय आहे सी-60 फोर्स? या फोर्समधील प्रशिक्षण सामान्य पोलिसांपेक्षा खूप वेगळं आहे. हे खास जंगल युद्धासाठी प्रशिक्षित आहेत. यांना हैदराबादच्या ग्रे-हाऊंड्स, मानेसरच्या एनएसजी आणि पूर्वांचलच्या आर्मीच्या जंगल वॉरफेयर शाळेतून प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. या कमांडोचे शस्त्रही इतर फोर्सपेक्षा वेगळे आहेत. नक्षलवादी हे याच जंगल परिसरातील तरुण मुले, यांचे नातेवाईक, जंगलातच राहणारे, तिथलीच भाषा बोलणारे आणि तिथले रस्ते, लोक ओळखणारे असतात. पोलीस जवानांना नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करणं कठीण होत होतं. त्यातूनच सी-60 ची संकल्पना 1990 साली समोर आली. 1990 साली स्थानिक तरुण निवडून, स्थानिक भाषेची आणि परिसराची उत्तम जाण असणाऱ्या पहिल्या 60 तरुणांची ही कमांडो फोर्स बनवण्यात आली. या 60 कमांडोंच्या फोर्सला निवडून शेकडो वर्षे झाले आहेत. मात्र ही फोर्स अजूनही सी-60 या नावानेच ओळखली जाते. सी-60 जवानांचं त्यागाचं आयुष्य सी-60 फोर्सचं आयुष्य हे त्यागाची पराकाष्ठा आहे. अनेक तास मृतदेह पाठीवर घेऊन, शस्त्र घेऊन, जंगल परिसरात अन्न-पाण्याविना चालायचं हे यांच्यासाठी नेहमीचंच काम आहे. स्वतःचं नाव सांगायचं नाही असा नियम आहे. एक सी-60 जवान गावातून या फोर्समध्ये गेला म्हणून नक्षलवाद्यांनी त्याचे वडील, मोठा भाऊ, काका आणि चुलत भाऊ या सर्वांची हत्या केली, उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवलं. शेकडो सी-60 जवान असे आहेत ज्यांच्या घरातील एका तरी व्यक्तीची ते या फोर्समध्ये गेले म्हणून नक्षलवाद्यांनी हत्या केली. स्थानिक तरुण या फोर्समध्ये भरती तर झाले, पण त्यांच्या उरलेल्या परिवाराला आपापली गावं आणि जमिनी सोडून पळावं लागलं आहे. सी-60 फोर्समध्ये जास्तीत जास्त स्थानिक आदिवासी तरुण आहेत. त्यांच्या आयुष्यातील विडंबन अनेकवेळा हे असतं, की त्यांचेच रक्ताचं नातं असलेले व्यक्ती हे त्यांच्या समोरच्या नक्षली दलामध्ये कार्यरत असतात. एखादा भाऊ घरी सुद्धा येतो. त्यांना हे सर्व सोडून द्या असा निरोपही आणतो. या तरुणांचे चेहरे आपल्याला माहिती नाहीत, नावे माहिती नाहीत. पण हेच सी-60 जवान नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ आहेत. संबंधित बातमी :