नवी दिल्ली: देशभरात बारावी बोर्डाचे निकाल येण्याच्या तयारीत आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी निकालानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना सतर्क राहावं, म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे.

या यादीत 24 बनावट विद्यापीठांची नावं आहेत. महत्त्वाचं म्हणजे या यादीत तब्बल 8 विद्यापीठं ही दिल्लीतील आहेत.

बारावीनंतर अनेक विद्यार्थी विविध कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतात. मात्र प्रवेश घेताना संबंधित कोर्सला मान्यता आहे का, याची पडताळणी होत नाही.

त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी यूजीसीने बोगस विद्यापीठांची यादीच जाहीर केली.

“सध्या देशभरात स्वयंभू आणि मान्यता नसलेली 24 विद्यापीठं यूजीसीच्या नियमांचं उल्लंघन करुन सुरु आहेत. या विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे. त्यांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नाही”, असं पत्रक यूजीसीने जारी केलं आहे.

बनावट विद्यापीठांची यादी

दिल्लीतील बनावट विद्यापीठं

कमर्शियल युनिव्हर्सिटी, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर-सेंट्रिक जूरिडिकल युनिव्हर्सिटी, इंडियन इंस्टिट्यूशन ऑफ सायन्स अँड इंजिनियरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, आध्यात्मिक विश्वविद्यालय आणि वाराणसेय संस्कृत विश्वविद्यालय

अन्य शहरातील बनावट विद्यापीठं

दिल्लीशिवाय देशातील अन्य शहरांमध्येही बनावट विद्यीपीठं आहेत. महाराष्ट्रातील नागपूरमध्येही एक बनावट विद्यापीठ आहे.

राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूर हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ बोगस विद्यापीठाच्या यादीत आहे.

याशिवाय उत्तर प्रदेशातील अलीगढ, कानपूर, प्रतापगढ, मथुरा, कानपूर आणि अलाहाबाद मधील विद्यापीठांचा समावेश आहे.

तसंच ओदिशा, पुद्दुचेरी, कर्नाटक, केरळ आणि बिहारचाही या यादीत समावेश आहे.